रविवार, १६ जून, २०१९

"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे", किंवा "धरित्रीने जणू हिरवा शालू दिमाखात मिरवावा", नाहीतर "दगडासारखा दगड पण त्यालाहि नाजूक नाजूक हिरवळ चढते", अशी काहीतरी वाक्यरचना करत दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शाळेच्या पहिल्या मराठीच्या तासाला निबंध खरडल्याच्या बहुतेक सगळ्यांच्याच आठवणी असेल… निबंधाचा विषय तोच, "शाळेचा पहिला दिवस" किंवा "माझा आवडता ऋतू - पावसाळा", पण दरवर्षी निबंध लिहिताना प्रत्येकांनी एक जास्तीचा पावसाळा बघितलेला, प्रत्येक वाक्यांमध्ये दरवर्षी थोडी प्रगल्भता… त्यात काही माझ्यासारखे पण नमुने जे आदल्या वर्षाची वही जपून ठेवणारे म्हणजे काही नवीन लिहायला नको… पण नेमकं दुसरीनी लिहिलेला निबंध ऐकताना आपल्याला असच लिहायचं होत अगदी पण सुचलच नाही असं दुःख,
पावसाला आणि शाळा साधारण पाठोपाठच सुरु होतात, त्यामुळे दर पावसाळ्यात शाळेची आठवण होणारच, अगदी सत्तरी ओलांडलेल्या आजी आजोबानाही येत असेल, यंदा लेक nursery मध्ये गेली, आयुष्यातलं सगळ्यात महत्वाच वळण, पुढे १३ वर्ष शाळा, त्यामुळे पुढची तेरा वर्ष लेकीसोबत माझ्याही आठवणीना उजाळा. नवीन वह्या पुस्तक, कोऱ्या करकरीत पुस्तकांना येणारा एक typical वास, मग पुस्तक वह्यांना cover घालून त्यावर नावं लिहिण्याचा सोहळा, डबा, water bottle, दप्तर, raincoat, सगळी तयारी उत्साहानं, आणि सुट्ट्या संपल्याच दुःख असूनही हवाहवासा वाटणारा शाळेचा पहिला दिवस….
शाळेच्या हातात हात घालून पावसालाही सुरु होतो, पावसाच्या पहिल्या थेंबांबरोबर "गारवा…", "पाऊस असा रुणझुणता…." "सावन का महिना..." सारखी गाणी अलगद ओठांवर रुंजी घालायला लागतात, मला नेहमी वाटत पावसाचा पहिला थेंब आपल्या थेट अंतरंगात जातो आणि आपला कायापालट करून टाकतो, निसर्गचाच चेहरामोहरा बदलवून टाकतो तर आपली काय मिजास……
रखरखीत उन्हानी करपलेला प्रत्येक जीव निर्जीव उजळून निघतो. पावसाळ्यात मला खास आकर्षण वाटत ते संध्याकाळच्या आकाशाच, निळशार आकाश आणि विधात्याने विविध रंगांची बेमालूमपणे केलेली उधळण… शाळा आणि कॉलेज मध्ये असताना कितीतरी अश्याच संध्याकाळ मी नुसत्या आकाश्याकडे पाहताच काढल्या…… मला अजूनही वाटत, आपले ज्यात्यावेळचे विचार, आपला मूड त्याला बरोबर कळतो आणि त्या एवढ्या विशाल canvas वर तो आपल्यासाठीच फराटे मारतो…
आजकालच्या so called busy schedule मध्ये एखादी तरी संध्याकाळ त्या आकाशासोबत हितगुज साधायला मिळवाययला हवी हो ना……
पूर्वा
No photo description available.

रविवार, २५ मार्च, २०१८

राजस्थान ट्रिप


राजस्थान ट्रिप
किती दिवसाच्या शोधमोहिमेनंतर श्री ट्रॅव्हल्स सोबत अखेर मारवाड राजस्थान जायचा निर्णय झाला, आमच्या आणि आर्याच्या, लेकीच्या सुट्ट्या विचारात घेऊन वर्षाअखेरचा आठवडा पक्का झाला, ऑफीस, घर, शॉपिंग, आर्याचं गॅदरिंग सगळं सांभाळत बॅग्स पॅक झाल्या
प्रवास सुरू झाला शुक्रवारी हाफ डे करून, पुणे ते अहमदाबाद. पहिलं नाविण्य होतं (आर्यासाठी, पर्यायांनी आमच्यासाठी पण) रेल्वे प्रवास. फ्लाईट च्या ऑड वेळा लक्षात घेऊन रेल्वेचा रात्रीचा प्रवास बरा असं वाटलं, पण एका बर्थ वर दोघींची थंडीतली रात्र बघून एकंदर ऑड  फ्लाईट च्या वेळा बऱ्या असा धडा मिळाला, पण तिनं एन्जॉय केलं फेरीवाले, रेल्वेतलं टॉयलेट.. आणि बरच काही 
पुणे अहमदाबाद रेल्वे प्रवास झाल्यावर आम्हाला श्री ट्रॅव्हल्सचा मॅनेजर भेटला आणि त्यांच्यासोबत आमचा प्रवास सुरु झाला
अहमदाबाद --> माऊंट आबू --> दिलवाडा --> हल्दीघाटी --> राणकपूर --> जोधपूर --> जैसलमेर--> बिकानेर--> जयपूर. जयपूरहुन रात्री फ्लाईट नी पुण्यात परत. रोज २५० ते ३०० किमी प्रवास. पण रस्ते आणि गाडी दोन्ही चांगले असल्याने प्रवास बराच सुखकारक झाला
श्री ट्रॅव्हल्स सोबत गेलं कि जेवणाचे मूळीच हाल होतं नाहीत, सकाळी किंवा चा बेड टीमग .३० ला भरपेट नाष्टा, उप्पीट, पोहे, मेदू वडे, बटाटे वडे, उत्तपा, शिवाय दूध कॉर्न फ्लेक्स, जॅम ब्रेड, ब्रेड बटर, जूस, चहा, कॉफी.. जेवायला दोन भाज्या, पापड, आमटी वरण, भाताची व्हरायटी, पोळी, आणि मेन म्हणजे रोज काहीतरी गोडं, अगदी पाकातले चिरोटे पण, पण रात्रीचा मनू साधा, त्यामुळे जळजळ, पोट बिघडणं वगरे नाही झालं.. 
 बऱ्याच फॅमिली सोबत असल्यामुळे आर्याला फ्रेंड्स मिळाले आणि आम्हालाही आमच्यासाठी वेळ मिळाला. आणि रोज हिंडायला सोबत गाईड मिळायचा त्यामुळे त्या ठिकाणाची बरीच माहिती मिळायची
असं म्हणतात, बऱ्याच शतकांपूर्वीच्या ज्वालामुखींमूळे राजस्थानचा बराचसा भाग तयार झाला. म्हणजे हि वाळवंटातील वाळू आणि मारवाड भर दिसणारे वेगवेगळे दगड हे ज्वालामुखीतून निघालेले रत्नचं म्हणावे लागतील. जोधपूरचे लाल दगड, जैसलमेरचे पिवळे, माउंट अबूचे संगमरवरी पांढरे, दगडादगद मधल्या वेगवेगळ्या गुणांमुळे त्यांच्यात साकारलेली नाजूक सुंदर नक्षीकाम  मन लुब्ध करून टाकते, डोळ्यांचं पारणं फिटत.. 
जैनांची मंदिरे, वेगवेगळे किल्ले (किल्ले कसले गडकोट) अप्रतिम आहेत, आणि जपलेले सांभाळलेले आहेत
पण या जपलेल्या गडकोट मंदिरांपेक्षा आपली भग्न मंदिरे आणि तोडफोड केलेले किल्ले जास्त भावतात कारण ती स्वराज्यातली आहेत. प्रत्येक वेळी गाईड सांगतो कि हमारा राणा और आपका सिवजी छोडके सब मोघल सरदार, असं ऐकलं कि ऊर भरून येतो, जाज्वल्य अभिमान वाटतो शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा.
वेगवेगळ्या ठिकाणच्या विशेष लक्षात राहिलेल्या काही आठवणी
छोट्यामोठया राजांच स्थान म्हणून हे राजस्थान, पण या राजांचं एकामेकांतच भांडण, त्यामुळे प्रत्येकाची स्वतंत्र संस्थान. . 
माउंट अबू - अब्रुदा देवीचं डोंगरवार स्थान म्हणून थोड्याश्या अपभ्रंशानी नामकरण झालेला माऊंट अबू, थंडीत कुडकुडत, गरमागरम सूपाचे  घोट घेऊन मिळतील तेवढ्या पांघरुणात शिरून गुडुप्प झालो
सनसेट बघण्यासाठी बाहेर पडलेले आम्ही आमच्या कळपापासून मागें पडलो, मग रस्ता चुकून भलत्याचं टेकाडाला लागलो, आणि टोकावर जाऊन सनसेट पाहू म्हणून त्या नादात किती उंचावर गेलो हे कळलंच नाहीसनसेट तर दिसलाच नाही पण चाचपडत अंधारात खाली उतरताना पळता भुई थोडी झाली
दिलवाडा टेम्पल - घराघरात चालणाऱ्या जावाजावांची भांडण पण त्या राजघरातल्या असल्यामुळे भांडणातून साकारलेली संगमरावरातील सुंदर कलाकृती म्हणजे टेम्पल चा एक भागतिच्यापेक्षा माझंच मंदिर सुंदर व्हावं म्हणून वेळा पडून पहिल्यापेक्षा अप्रतिम बांधलेले स्तंभ
हल्दीघाटी - सगळ्या राजपुती मोघलं साम्राज्याच्या मंडलिकांमध्ये राणा प्रतापसिंगच वेगळेपण मनाला भारावून टाकत
राणकपुरचं जैन मंदिर - एकाएका दगडात कोरलेल्या शेकडो स्तंभांवर उभारलेलं हे जैन मंदिर पाहताना नजर ठरत नाही एका ठिकाणी
जोधपूर - उम्मेद भवन, कोरड्या दुष्काळात, राजानी प्रजेला किल्ल्यात पोसायचं ठरवलं, पण मारवाडी लोकं फुकटचं खायला तयार होईना, म्हणून हे उम्मेद भवन गावकऱ्यांकडून बांधून घेऊन त्यांना धान्यपुरवढा केला
जोधपूरच्या घराघरांमध्ये बांधणी चे कपडे बनवण्याचं काम चालत, कपडे वळताना जागोजागी दिसतात, अर्थात इथे श्री ग्रुपमधल्या बायकांनी त्यांच्या नवऱ्यांचे खिसे कापण्याचे काम करणं अपरिहार्यच होतं
मेहरान फोर्ट, सगळेच किल्ले बघताना वाईट वाटायचं ते त्या कालच्या त्यांच्या पडदा संस्कृतीचं आणि २० ते ५० अशा कितीही असलेल्या राण्यांचं
असं म्हणतात जनानखान्यातल्या काही राण्यांना त्यांच्या लग्नानंतर राजांची उभ्या जन्मात भेट झाली नाही.. 
जोधपूरला ब्लू सिटी म्हणतात, कारण उन्हाचा दाह जाणवू नये म्हणून घरांना, तिथल्याच खास प्रकारचा निळा रंग देतात
जैसलमेर- हि आता गोल्डन सिटी, जिकडे तिकडे पिवळ्या दगडांचे उन्हामध्ये तळपणारे पॅलेस, सगळे पॅलेसचं साधी घरं कुठे म्हणून नाहीतच
गोल्डन पॅलेस, पॅलेस म्हणजे सौरक्षक बुरुजांआड वसलेलं छोटं गावं, बघायला गेलो ते साखळी करूनच, नाहीतर भूलभुलैया गल्ल्यांमध्ये हरवायचो
सावकारी करणारे जैन लोक, म्हणून हिंदू राजाच्या पॅलेस मध्ये खास जैनमंदिर, सावकारानी राजाला मदत करावी म्हणून. मंदिरात २४ महावीरांच्या ९०% सोन्याच्या लहान मोठ्या मुर्त्या बघून, आपण त्यांच्या श्रीमंतीची कल्पनाच केलेली बरी
जैसलमेर म्हणजे दूरवर पसरलेला वाळवंट, राज्यातला सगळ्यात जास्त क्षेत्रफळाचा आणि सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा. पूर्वी युरोप किंवा चीन मध्ये जाणारा येणारा माल वाळवंटातूनच जायचा, त्यामुळे हे मारवाडी जैन, व्यापाऱ्यांना दळणवळणासाठी उंट आणि चारा पाणी पुरवून उदरनिर्वाह करत. पण काही चतुर व्यापाऱ्यांनी जाणून भारतभरातून येणारा माल कमी किमतीत खरेदी करायला सुरवात केली, आणि स्वतः यूरोप चीन मध्ये विकून बक्कळ पैसा कमवायला सुरवात केली, आणि तसंच यूरोप आणि चीन च्या बाबतीतहि करू लागले, त्यानंतरच समुद्र मार्गांचा शोध लागला
अशा या चतुर जैन सावकारांच्या मोठमोठ्या हवेल्या जैसलमेर मध्ये आता सरकारजमा झाल्या, या हवेल्याचं सौन्दर्य राजांच्या पॅलेस ना फिकं पाडेल, जिकडे तिकडे नखशिखांत नक्षीकाम दगडातलं, आणि छपर ल्यालीत सोन्याच्या वल्खानी
देशाला फाळणीचा बसलेला एक फटका म्हणजे हे दगड मिळतात भारतात आणि फाळणी नंतर, सगळे कारागीर गेले पाकिस्थानात, त्यामुळे ती कला आता हळूहळू लोप पावतीय
या हवेल्यानमध्ये मोठमोठे हांडे आणि ओघराळे आहेत, म्हणतात इथे पिढ्यांपिढ्याना ढगांचा गडगडाटही ठाऊक नाही. कधीतरी चुकून माकून पाऊस आलाच तर ते पावसाचं गोडं पाणी या हंड्यांमध्ये साठवायचे, आणि ठेवा म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हे साठवलेलं गोडं पाणी मिळे
आता मात्र परिस्तिथी बदललीय बहुतेक जिल्हे पाण्यानी जोडलेत
राजस्थानच सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे वाळवंट, आणि आम्ही खरोखर धमाल मजा केली ती इथेच. त्याची सुरवात झाली, राजस्थानी ढंगाची उडत्या चालीची गाणी ऐकत, तरी श्वास रोखून घेत, वाळवंटातल्या रेतीला जुमानता फूल स्पीड मध्ये उधळणार्या जीप राईडनी
मग उंच मानेचं, त्याच्या ओभडधोबड आकाराचं कौतुक वाटणाऱ्या त्या प्राण्याचं, चित्रविचित्र हिसके सोसत आम्ही विराजमान झालो ते मायकेल जॅक्सन नावाच्या उंटावर, त्याच्यावर बसून खास शैलीतले फोटो सेशन करूनच आम्ही कृतकृत्य झालो
सनसेट होईपर्यंत, लहान मोठं तमा बाळगता वाळूत मनमुराद लोळलो, आर्याची क्षणचित्रं बघण्यासारखीच आहेत
त्यानंतर आणि एक आकर्षण सॅमच्या टेन्टचं, आणि तिथल्या कल्चरल प्रोग्रॅमचं
राजस्थानात जागोजागी पाहायला मिळतात त्या वेगवेगळ्या कला, मग त्या हातचलाखीच्या असोत, कट्पुतळीच्या खेळाच्या असोत, वाद्यांच्या असोत नाहीतर अवघड नृत्यांच्या. असं सांगतात कि वाळवंटात, गुरांच्या चाऱ्यासाठी दूरवर भटकावं लगे, आणि हे लोक दूरवर हिंडत, करमणुकीसाठी अश्या कला शिकतं, आणि त्यात पारंगत होत.
त्यानंतर खास राजस्थानी दालबाटी, चुरमा, गट्टे कि कढी पिऊन आम्ही आमच्या रसना तृप्त केल्या आणि झोपेच्या अधीन झालो, कारण आमचा दुसरा दिवस उजाडणार होता पहाटे वाजता बेडटी सोबत पुढच्या प्रवासाला सज्ज होण्यासाठी
बिकानेर - बिकानेर प्रसिद्ध आहे ते नमकीन, फरसाण, भुजिया आणि घीवर साठी. तिथे आम्ही त्यावर ताव मारला हे सांगणं नकोच
इथलं आणिक एक आश्चर्य म्हणजे करणी माता मंदिर, आपल्याकडे कसं सावित्रींनी सत्यवानाला तिच्या नवऱ्याला यमाशी भांडून परत आणलं, तसंच त्या करणी मातेनं आपल्या मुलाला जिवंत करून आणलं, पण त्यावर यमानी सांगितलं म्हणे त्याच्या पुढच्या कुठल्याच पिढयांना स्वर्ग किंवा नरकात सस्थान नाही, त्यामुळे त्यांच्ये सगळे वंशज उंदराच्या रूपांत मंदिरात हिंडतात, त्यांना शक्य असूनही ते मंदिरातून बाहेर पडत नाहीत.. 
जुना गड फोर्ट, तिथलं वैशिट्य मला जाणवलं ते एवढ्या मोठ्या किल्यात एका दालनातून दुसऱ्या दालनात जाणाऱ्या चिंचोळ्या वाटांच, भुईकोट किल्यांमध्ये शत्रूची भीती जास्त, तर या चिंचोळ्या वाटा मोठ्या शत्रुसैन्याला आत घुसू देत नाहीत
जयपूर- पिंक सिटी, कुठल्याश्या इंग्रजी अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी तेव्हाच्या राजानी सगळ्या इमारतींना गुलाबी रंग दिला, या गुलाबी इमारती अजूनही आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायला दिमाखात उभ्या आहेत 
इथे बिर्ला मंदिर, आणि सिटी पॅलेस बघितला, पण माझ्यासाठी मुख्य आकर्षण होतं, ते जोहरी बझार आणि बापू बझार, मिळालेल्या दोन तासांत काय घेऊ आणि काय नको असं करून, बॅगांना तट्ट फुगवून आम्ही रात्रीच्या फ्लाईट नि परतीच्या मार्गाला लागलो, आणि रात्री १२ नंतर मुक्कामी आपापल्या घरी विसावलो