शब्दावाचून कळले सारे

ओशन ब्ल्यू रंगाची झिरझिरीत साडी, त्यावर गडद रंगाचे बारीक ठिपके आणि नाजूक चंदेरी काठ. त्यावर त्याच रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज. डस्की रंगाची ती, हलका मेक-अप, चंदेरी मोठ्या पण नाजूक रिंगा आणि मोकळे सोडलेले केस... या पेहरावात तिचं मादक रूप अधिकच खुलून दिसत होतं.

मैत्रिणींबरोबर ती एका गाण्याच्या कार्यक्रमाला निघाली होती. वाटेत एक मैत्रिण चिडवते, "हिला उगीच बोलावलं, सगळा भाव हीच खाऊन जाणार!" दुसरी म्हणते, "आज किती जण पाडणार गं?" पण या सगळ्या चिडवण्याला तिची प्रतिक्रिया फक्त एक गोड स्मित हास्य...

पण डोक्यात मात्र फक्त त्याचाच विचार... 'इथे भेटेल का?... किती दिवस उलटून गेलेत... शेवटच्या भेटीच्या आठवणी देखील पुसट होत चालल्यात...' तो असा अचानक नाहीसा झाला होता, कशाच्यातरी शोधात, आपल्याच नादात, 'वाट नको बघूस' असं सांगून.

तिला वाटायचं, 'आपलं थोडंच असं होतं...' मनात येतं, 'आपलंच काही चुकलं का, त्याशिवाय पत्ता न सांगता निघून जाईल? आठवणी पुसट होतायत की एक-एक क्षण डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळत राहतोय?' मग ती स्वतःला जपते, छान दिसते, विचार करते, 'अचानक गाठभेट झाली तर?' आणि मग भेटच झाली नाही तर हिरमुसून जाते.

पण आज तिला आतून वाटत होतं, त्यांची भेट होणार!

कार्यक्रमाला जाताना वाटेत एक कॅफे लागतो. त्याच्या आवडीचा! ती सहज डोकावते, तर चक्क पाठमोरा बसलेला तो! डोळ्यांवर विश्वासच बसेना. मैत्रिणी म्हणतात, "यडे! आम्हाला पण तोच दिसतोय, स्वप्न नाहीये! जा लवकर..."

ती त्याच्या जवळ जाते... तो परत आलेला असतो. दाढी-मिशा वाढलेला, मळकटलेला... तिला तरीही तो लोभस वाटतो. त्याला बघून छातीत उठलेली कळ ती लपवू शकत नाही. डोळ्यांतून आनंदाश्रू तिच्या परवानगीशिवाय वाहायला लागतात. तो म्हणतो, "ज्या शोधात हिंडत होतो ते गवसलंय, पण तुझ्यासमोर कोणत्या तोंडानी यावं कळेना, म्हणून इथेच येऊन तुझी वाट बघत बसलो."

आता दोन जीव बेभान होतात, स्थळा-काळाचं भान हरपून एकच होऊन जातात... परत कधीच विलग न होण्यासाठीच!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४