आई, पसारा आणि एक निरागस मिठी
जेव्हा आजी-आजोबा चार वर्षं सोबत राहून कायमचे गावी परत गेलेले असतात, तेव्हा घरातली सपोर्ट सिस्टीम अचानक गायब झाल्यासारखी वाटते. नवीन आधार अजून अस्तित्वात आलेला नसतो. आई ऑफिसमध्ये ९ तास काम करून घरी येते, किंवा घरकामातून थकून उठते... आणि हॉलमध्ये नजर फिरवते — पसारा पाहून थकवा दुप्पट होतो. पूर्ण हॉल भर खेळण्यांचा सडा पसरलेला असतो. कॉटवर पुस्तकं, वह्या, पेन्सिल, पेन — सगळं काठोकाठ भरलेलं. आदल्या दिवशीच मेरी कोंडो स्टाईलने घडवलेले कपडे, ऑर्गनायझर्ससकट फरशीवर विस्कटलेले. किचन कट्ट्यावर दूध, चहा, भाजी, भात — सगळं अर्धवट. पाण्याचे तांबे, प्यायलेली-न प्यायलेली भांडी, रिकामे कप — एकत्र गूण्यागोविंदाने नांदत असतात. देवही रांगोळीत, हळदी-कुंकवात, शांतपणे विश्रांती घेत असतो. आईच्या डोक्यात कामांची यादी ठरलेली असते — कपड्यांचं मशीन लावायचं, भांडी जागेवर ठेवायची, कुकर लावायचा, भाजी करायची, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या, आणि धुतलेले कपडे वाळत घालायचे... कामं आवरता आवरता मुलांना दिवसभराची ख्यालीखुशाली विचारायची — हे सगळं मनात चालू असतानाच, पसारा पाहून तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचते....