माझे पावसाळे
"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे", किंवा "धरित्रीने जणू हिरवा शालू दिमाखात मिरवावा", नाहीतर "दगडासारखा दगड पण त्यालाही नाजूक नाजूक हिरवळ चढते", अशी काहीतरी वाक्यरचना करत दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शाळेच्या पहिल्या मराठीच्या तासाला निबंध खरडल्याच्या बहुतेक सगळ्यांच्याच आठवणी असतील …
निबंधाचा विषय तोच,"शाळेचा पहिला दिवस" किंवा "माझा आवडता ऋतू - पावसाळा", पण दरवर्षी निबंध लिहिताना प्रत्येकांनी एक जास्तीचा पावसाळा बघितलेला असतो, प्रत्येक वाक्यांमध्ये दरवर्षी थोडी प्रगल्भता येते. त्यात काही माझ्यासारखेपण नमुने जे आदल्या वर्षाची वही जपून ठेवणारे, म्हणजे काही नवीन लिहायला नको… पण नेमकं दुसरीने लिहिलेला निबंध ऐकताना आपल्याला असंच लिहायचं होतं अगदी, पण सुचलंच नाही असं दुःख.
पावसाळा आणि शाळा साधारण पाठोपाठच सुरु होतात, त्यामुळे दर पावसाळ्यात शाळेची आठवण होणारच, अगदी सत्तरी ओलांडलेल्या आजीआजोबांनाही येत असेल, यंदा लेक नर्सरीत गेली, आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वळण, पुढे १३ वर्ष शाळा, त्यामुळे पुढची तेरा वर्ष लेकीसोबत माझ्याही आठवणींना उजाळा.
नवीन वह्या पुस्तकं, कोऱ्या करकरीत पुस्तकांना येणारा एक टिपिकल वास, मग पुस्तक वह्यांना कव्हर घालून, त्यावर नावं लिहिण्याचा सोहळा, डबा, पाण्याची बाटली, दप्तर, रेनकोट, सगळी तयारी उत्साहानं आणि सुट्ट्या संपल्याचं दुःख असूनही हवाहवासा वाटणारा शाळेचा पहिला दिवस.
शाळेच्या हातात हात घालून पावसाळाही सुरु होतो, पावसाच्या पहिल्या थेंबांबरोबर "गारवा…", "पाऊस असा रुणझुणता…." "सावन का महिना..." सारखी गाणी अलगद ओठांवर रुंजी घालायला लागतात, मला नेहमी वाटत पावसाचा पहिला थेंब आपल्या थेट अंतरंगात जातो आणि आपला कायापालट करून टाकतो, निसर्गचाच चेहरामोहरा बदलवून टाकतो तर आपली काय मिजास.
रखरखीत उन्हानी करपलेला प्रत्येक जीव आणि निर्जीव उजळून निघतो. पावसाळ्यात मला खास आकर्षण वाटत ते संध्याकाळच्या आकाशाच, निळशार आकाश आणि विधात्याने विविध रंगांची बेमालूमपणे केलेली उधळण.
शाळा आणि कॉलेज मध्ये असताना कितीतरी अश्याच संध्याकाळी मी नुसत्या आकाश्याकडे पाहताच काढल्या.
मला अजूनही वाटत, आपले ज्या-त्या वेळचे विचार, आपला मूड त्याला बरोबर कळतो आणि त्या एवढ्या विशाल कॅनव्हासवर तो आपल्यासाठीच फराटे मारतो.
आजकालच्या सो कॉल्ड बिझी शेड्युल मध्ये एखादी तरी संध्याकाळ त्या आकाशासोबत हितगुज साधायला मिळवाययला हवी हो ना……
खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवा😊
हटवाखूप छान. आठवणी ना उजाळा मिळाला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाफ्लॅशबॅक मध्ये आल्यासारखं वाटलं, मस्तच 👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा