स्त्री तत्व आणि पुरुष तत्व दोन्ही आत्म्यात स्थित, पण जेव्हा आत्मा शरीर धारण करतो तेव्हा शिकत जातो, शरीराप्रमाणे त्या त्या तत्वाला जोपासायला. स्त्रीला उपजत सृजनाची जाण येते, त्या सोबत ती काळजी घ्यायला शिकते, माफ करायला शिकते, प्रेम करायला शिकते, अजाणतेपणी. पुरुष शिकत जातो, निधडेपण, धाडस. शरीर पण असंच घडवलंय त्या विधात्याने कि ते ते गुण शोभून दिसतील त्या त्या शरीराला. 

मग हे असे दोन ध्रुवांवरचे दोन देह अतिशय भिन्न स्वभावाचे आणि त्यामुळेच एकमेकांकडे आकर्षित व्हायला लागतात, सगळीच निसर्गाची किमया, हे चुंबकाच्या वरचं आकर्षण, त्याचं रूपांतरण मिलनात, स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचं मिलन, तिच्यासाठी  सृजनाची गरज, आणि त्यातून हि ओढ, त्याच्यासाठी हे एक धाडस, त्यातून परत एका तिचा किंवा त्याचा अविष्कार. तो बेलगाम, ती गुंतलेली, त्या आविष्कारात, त्या सृजनाची झळाळी तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण रोमारोमात, पालन पोषण, काळजी घेणे हे तिचे गुण, आता त्याचा गुण धाडसाचा, मिळवण्याचा, जगाशी चार हात करण्याचा. 

हा काळ विरहाचा, दोघांना आपलं स्त्रीत्त्व आणि पुरुषतत्व सिद्ध करण्याचा, तरीही तिच्या गुणांनी तो, आणि त्याच्या गुणांनी ती परत आकर्षित होण्याचा, आणि त्या आकर्षणाची परिसीमा म्हणजे परत एकदा मिलन, विरहानंतरचं मिलन, हे मिलन म्हणजे प्रेमाचा अविष्कार यात फक्त आकर्षण नाही. या मिलनात मिळणारी शांती, कदाचित पुन्हा नव्या आविष्काराची सुरुवात, आणि परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवण्याची धडपड. दोघांचीही. 

या चक्रात असणारे दोन भिन्न गुणांची शरीर आता, आत स्थित असलेल्या गुणांसोबत ढवळून निघतात, इतके एकमेकात मिसळून जातात, कि आता काळजी घेणारी ती आता एक धाडसी स्त्री कधी बनते तिचं तिलाच कळत नाही, आणि बलाची जोपासना करणारा तो एखाद्या भावुक क्षणी हळवा बनून जातो. 

हे असंच होणं अपेक्षित असेल विधात्याला.. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४