फिनलंड ट्रीप डायरी २७ नोव्हेंबर २०१४

 

परवा जंगल टूर होती अर्थात फॉरेस्ट व्हिजिट, आम्ही चौघ जण होतो. सांगितल्या प्रमाणे गोठणाऱ्या थंडीपासून बचाव करणारं सगळं समान गोळा केलं, माझ्या रोजच्या ड्रेस वर जर्किन घातल्यावर अगदी आरामात बसेल अशी डंगरी, त्यावर त्याहून मोठा ओव्हरकोट, दोन हात आरमात मावतील एवढे मोठाले हॅन्ड ग्लोव्हस, माझ्या मापाच्या एक माप मोठे आणि मोठाले गमबूट. शिवाय कॅमेरा, सगळं घेऊन आम्ही जंगलात निघालो,  साधारण एकशेवीस किलोमीटरवर होतं ऑफिसपासून, शंभरच्या स्पीडनी वोल्वो कार पळत होती. सरळ सरळ लांबच लांब रस्ते, पूर्ण प्रवासात एकही खड्डा नाही, अगदी आतल्या वळणावरही, रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकांशी स्पर्धा करत उंचच उंच वाढलेली झाडं, आणि मध्येच कुठेतरी झाडांमध्ये विसावलेलं फिनिश पद्धतीच उतरत्या पांढऱ्या छपराच, लाकडी घर.  थोड्याथोड्या अंतरावर गोठून पंढरी शुभ्र झालेली छोटी मोठी तळी. जंगलात चाललो होतो म्हणण्यापेक्षा जंगलातूनच चाललो होतो, फक्त जिथे आमचं मशीन झाडं तोडतंय तिथे, इथे सत्तर टक्के जंगलं हि खाजगी आहेत, आणि लोक आपल्या जंगलात या फॉरेस्ट्री मशीनरी बोलावून, झाड तोडून, लाकूड विकून बक्कळ पैसा कमावतात

साधारण एका तासाभरात त्या ठिकाणी पोहोचलो, मग सोबत आणलेला पोषाख परिधान केला, कार मधून बाहेर पडून सगळं घालेपर्यंत चांगलचं गारठायला झालं, मग एवढे मोठाले जड बूट घालून चालणं म्हणजे माझी चांगलीच कसरत झाली . आता जंगलात आत जायचं होत, खाचखाग्यातून तोडलेल्या फांद्यांवरून आणि तेवढ कमी म्हणून बर्फातून चालताना माझी नुसती त्रेधतिरपट उडाली. बरं हे सगळं माझ्यासाठी, ते सगळे बिनधास्त चालत होते, कारण त्यांना बूट आणि बर्फ दोन्हींची सवय. असा एकंदरीत माझा अवतार बघून माझ्या कलीगला माझी दया आली. त्यानी ड्राइवरला कॉल करून मशीन  बाहेर आणायला सांगितलं, मशीन दिसायच्या टप्प्यात आल्यावर माझ्या जीवात जीव आला.

जंगलात प्रामुख्यानी तीन प्रकारची झाड असतात पाईन, स्पर्स आणि बर्च, मग त्या ड्राइवरनी एका मिनिटाला एक झाड खोडापासून तोडून, त्याच्या बाकीच्या फांद्या काढून त्याचे एकसमान तुकडे करून बाजूला टाकले. दहा मिनिटात त्यांनी किमान सात आठ झाडं तोडून तुकडे करून बाजूला टाकली, मग खाली उतरून सगळ्यांसोबत हस्तांदोलन केल आणि मशीनचा फीडबॅक द्यायला सुरवात केली, त्यांची ती अगम्य भाषा माझ्या डोक्यावरून जात होती त्यामुळे मी सरळ बाजूला येउन फोटो काढले.  शेवटी माझ्या कलिगने सांगितलं कि एखादी किरकोळ गोष्ट सोडली तर तो मशीनवर खुश आहेत्याला चॉकलेटचा डबा गिफ्ट करून आम्ही परत निघालो. त्या पोशाखाची एक तासभर सवय झाल्यामुळे म्हणा कि आणि काही कारणांनी म्हणा माझा चालण्याचा स्पीड कौतुकास्पद वाढला होताआता परत गाडीत बसायचं म्हणजे परत कपडे बदलायचे होते त्या दोन चार मिनिटात मी अशी गारठले कि मला काहीच करता येईना.  ती जाड डंगरी आणि बूट काढताना माझा हात प्रचंड थरथरायला लागला. शेवटी माझ्या सोबत असलेला फ्रेडरिक जर्मन मुलगा म्हणाला तू गाडीत जाऊन बस आता, तुझं समान मी डिक्कीत टाकतो. माझ्यासाठी एवढी थंडी हा भयानक अनुभव होता, हाताच्या बोटांची नखं बहुतेक तुटून बाहेर येतील असं वाटायला लागलं, त्यांनी सांगितल्यावर काही आढेवेढे घेता पटकन गाडीत जाऊन बसले, बिचाऱ्यानी माझे बूटही उचलून ठेवले.  इथल्या गाड्यांना सीट गरम व्हायची सोय असते, गरम सीट वर बसूनही नॉर्मलला यायला मला पंधरा वीस मिनिट लागली. जरा अर्धं अंतर गेल्यावर एका सुंदर रेस्टोरंट मध्ये जेवायला थांबलो, जेवण आणि रेस्टारंट दोन्ही अप्रतिम होत. परत निघालो, आता सगळ्यांची बडबड बंद होती, बाहेर झाडं धावत होती त्याबरोबरीन आत माझे विचार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४