फिनलंड ट्रीप डायरी ४ डिसेम्बर २०१४

 जवळजवळ महिनाभरानंतर सूर्य दिसला. एरवी आपल्याला सूर्याचं काय कौतुक असतं? पण आज पाहिल्यावर खरंच खूप बरं वाटलं. तोही आपल्या इथल्या सारखा लालबुंद, प्रखर गोळा नाही. शीतल, शांत, पांढऱ्या रंगाचा — जणू चंद्रच. असं वाटत होतं, बिचारा अतोनात प्रयत्न करतोय स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा. खरंच काय ना, ही निसर्गाची किमया!  

इथल्या थंडीपुढे बिचाऱ्या सूर्याचं काही चालत नाही, तिथं माझ्यासारखीची काय गत?
आज जरा वारंही सुटलंय. पण छान वाटत होतं — उंचच उंच झाडांचे शेंडे हलके हलके डोलत होते, जणू तेही आनंद व्यक्त करत असावेत सूर्य दिसला म्हणून.

संपूर्ण परिसर पांढऱ्या रंगात न्हालेला आहे, आणि ही निष्पर्ण झाडं — जरी पानं गाळलेली असली, तरी खूपच लोभस वाटतात. एरवी स्थितप्रज्ञ वाटणारी ही झाडं आज हलकेच डोलत होती, जणू सूर्याच्या आगमनाने त्यांच्यातही प्राण संचारलेला. त्या डोलण्यात एक नजाकत होती, एक न बोलता व्यक्त होणारा आनंद — जणू निसर्ग स्वतःचं मौन मोडून हसत होता."

या गावात 'पिएलिस' नावाची एक नदी आहेइथे नदीला 'जोकी' म्हणतात. ती अगदी ऐसपैस वाहतेय — शांत, स्थिर, पण सतत प्रवाही. कारण पाणी सतत वहात असल्यामुळे ही नदी लगेच गोठत नाही. मला रोज ऑफिसला जायचं असेल तर ही नदी पार करावी लागते. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फ, आणि त्यातून मधून वाहणारी ही नदी — किती सुंदर दृश्य असतं म्हणून सांगू! जेवढं डोळ्यात साठवता येईल तेवढं कमीच वाटतं.

पण हे सौंदर्य कॅमेराबद्ध करणं माझ्याच्यानी काही जमत नाही. एवढ्या थंडीत फक्त photography साठी बाहेर पडणं — विचार करूनच गोठायला होतं! मी आपली taxi मध्ये बसून जमतील तेवढे click मारते.

या नदीवर एक नवीन लाकडी पूल बांधलाय — चालत किंवा सायकलवरून जाण्यासाठी. संध्याकाळी संपूर्ण bridge वर सुंदर lighting केलेली असते. काळोखात तो पूल एकटाच दिमाखात चमकत असतो — जणू बर्फाच्या साम्राज्यातला एक तेजस्वी रक्षक."


"फिनिश लोकांच्या दृष्टीनं वर्षातला सगळ्यात त्रासदायक ऋतू म्हणजे तापमान शून्याच्या आसपास असलेला काळ.
एक दिवस जोरदार बर्फवृष्टी होते, आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे बर्फ वितळून पाणीपाणी होतं — जणू निसर्ग स्वतःचं रूप बदलतोय, पण त्यात सौंदर्यापेक्षा अस्वस्थता अधिक. अशा हवामानात वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. या ऋतूमध्ये आलात आणि तुम्हाला फ्लू झाला नाही, तरच नवल!

अर्थात, Finnish Flu मी चांगलाच अनुभवतेय — प्रचंड थंडी, मग घाम, आणि आता अशक्तपणा. पण बरी झाले नाही तर flight मध्ये मला घेणार नाहीत, त्यामुळे प्रयत्नपूर्वक बरी होत आहे.

आता मात्र मनात वेध लागलेत — भारताचे, पुण्याचे, माझ्या घराचे, माझ्या पिल्याचे, माझ्या माणसांचे. आणि माणसांचेच नाही, तर माझ्या वस्तूंचेही.
माझ्या पसंतीनं खरेदी केलेल्या घरातल्या प्रत्येक वस्तूची आठवण येतेय — फोडणीचा डबा, कचऱ्याचा डबा, दारातला shoe stand, bedroom मधला double bed, तुळशी वृंदावन, देव्हारा, आर्याची सगळी खेळणी, parking मधली गाडी... सगळं सगळं.

माझं रोजचं routine — ज्याला कधी कंटाळले होते, तेच आता हवंहवंसं वाटतंय. लांब गेलं की त्याची खरी किंमत कळते, नाही का?"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४