मुखवटे आणि मनाच्या खोल जखमा
किती प्रकारचे मुखवटे...
ज्याचा त्याचा रंग, रूप, गुण, भूतकाळ, भविष्य, वर्तमानानुसार.
ज्याचे त्याचे — एकदम युनिक. विशेष म्हणजे, स्वतः बनवलेले.
सुखी असल्याचे, आनंदात असल्याचे, समाधानाचे मुखवटे.
पण हे मुखवटे काढून ठेवले की, प्रत्येकाच्या मनात खोलवर लागलेली बोचरी, आतल्या आत भळभळणारी जखम दिसते.
कोणाला तब्येतीची चिंता, कोणाला नात्यांची.
कोणी पैशांअभावी उदास, कोणी मुलं नसल्यामुळे चिंतीत,
तर कोणी आहेत ती झेपत नाहीत म्हणून कावलेली.
कोणी लग्न होत नाही म्हणून दुःखात, तर कोणी लग्न करूनही सुख मिळत नाही म्हणून दुःखात.
पण...
सुखाचे मुखवटे घालून मिरवण्यात सगळेच तरबेज.
कारण भळभळ वाहणारं दुःख सगळ्यांना दाखवत फिरण्यात तरी काय शहाणपण?
कधीतरी, कोणासमोर तरी हा मुखवटा गळून पडतो.
कोणी प्रेमाने जवळ घेतं — मन मोकळं होतं, शक्ती वाढते.
कोणी परका चेष्टा करतो — जखम अजून खोल जाते.
प्रेमाने जवळ घेतलं की माणूस पुन्हा एक नवीन, अधिक मजबूत मुखवटा बनवतो.
पण एक गोष्ट लक्षात ठेवावी —
जेवढी गोष्ट जास्त वैयक्तिक, तेवढीच ती जास्त सार्वत्रिक.
हा नियम सगळीकडे लागू होतो.
आपण एकदा विचारांच्या जंगलात अडकलो की,
जसं जंगलात नरभक्षक प्राणी किंवा विषारी झाडं असतात,
तसंच इकडे हे नरभक्षक विचार वास करत असतात.
खूप विचारांत गुंतायचं नाही.
आलेच, तर त्यांना दारातून परत पाठवायचं.
जरा स्वागत केलं, की हे विचार ठाण मांडून बसतात.
दारातून आत आलेच असतील, तर त्यांचा पाहुणचार नाही करत बसायचा.
खूप लेयर्स तयार न करता — सरळ रडून घ्यायचं.
एकटं किंवा कोणातरी आपल्या माणसासमोर.
एकदा वाहून गेलं की मन शांत होतं.
आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानायचे...
आणि निश्चिंत व्हायचं.
खरंच... मुखवटे घालणं सहज आहे, पण कधीतरी त्यांना उतरवून ठेवणंही आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा