आई, पसारा आणि एक निरागस मिठी

जेव्हा आजी-आजोबा चार वर्षं सोबत राहून कायमचे गावी परत गेलेले असतात,
तेव्हा घरातली सपोर्ट सिस्टीम अचानक गायब झाल्यासारखी वाटते.
नवीन आधार अजून अस्तित्वात आलेला नसतो.
आई ऑफिसमध्ये ९ तास काम करून घरी येते, किंवा घरकामातून थकून उठते...
आणि हॉलमध्ये नजर फिरवते — पसारा पाहून थकवा दुप्पट होतो.

पूर्ण हॉल भर खेळण्यांचा सडा पसरलेला असतो.
कॉटवर पुस्तकं, वह्या, पेन्सिल, पेन — सगळं काठोकाठ भरलेलं.
आदल्या दिवशीच मेरी कोंडो स्टाईलने घडवलेले कपडे, ऑर्गनायझर्ससकट फरशीवर विस्कटलेले.
किचन कट्ट्यावर दूध, चहा, भाजी, भात — सगळं अर्धवट.
पाण्याचे तांबे, प्यायलेली-न प्यायलेली भांडी, रिकामे कप — एकत्र गूण्यागोविंदाने नांदत असतात.
देवही रांगोळीत, हळदी-कुंकवात, शांतपणे विश्रांती घेत असतो.

आईच्या डोक्यात कामांची यादी ठरलेली असते —
कपड्यांचं मशीन लावायचं, भांडी जागेवर ठेवायची, कुकर लावायचा, भाजी करायची,
वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या, आणि धुतलेले कपडे वाळत घालायचे...

कामं आवरता आवरता मुलांना दिवसभराची ख्यालीखुशाली विचारायची —
हे सगळं मनात चालू असतानाच, पसारा पाहून तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचते.

तरीही आई दीर्घ श्वास घेते...
शांत स्वरात लेकाला विचारते —
"अरेच्चा, आई-बाबांचं कपाट सगळं तसंच राहिलंय की! चला, सगळं खाली काढू — काहीच रहायला नको जागेवर..."

तीन वर्षांचा लेक निरागसपणे विचारतो —
"आई, दोघं मिळून काढूया का सगळं?"

त्या क्षणी खरंच कळत नाही — हसावं की रडावं. 😇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४