फिनलंड ट्रीप डायरी १२ नोव्हेंबर २०१४
आज ताम्पेरेतला शेवटचा दिवस होता, पेरत्तू काहीतरी भेट द्यायची होती, मॉल मध्ये थँक यु ग्रीटिंग्ज बघितले, पण खूपच महाग वाटले, मग काळ संध्याकाळी घरी आल्यवर एक ग्रीटिंग तयार केलं, उडणाऱ्या फॉर्वर्डरचं किंवा ओंडके पकडलेल्या हेलिकॉप्टरचं स्केच बघितलं होतं ऑफिसमध्ये तसंच स्केच काढलं कागदावर, ऑफिसमधून निघतानाचं पेन्सील, रबर आणि कागद घेऊन ठेवला होता. स्केच काढून त्याला गिफ्ट केलं, इतका खुश झाला, त्याच्या क्युबिकलमध्ये लावलं ते ग्रीटिंग त्यानी.
बाकी मग सगळ्यांना बाय म्हणून, साडेदहाला ऑफिसमधून बाहेर पडले.बॉस मिक्को सोबत होता त्यामुळे ट्रेनच्या प्रवासाचा काही ताण नव्हता. बिचाऱ्यानी माझी तेवीस किलोची बॅग कॅरी केली, कौतुकाची गोष्ट अशी माझ्यापेक्षा ग्रेडनी, वयानी आणि अनुभवानी एवढा मोठा असलेला माणूस फक्त मला एकटीला सामान घेऊन जाणं अवघड जाईल म्हणून आला होता. मग रेल्वे स्टेशनची, तिथल्या सोयींची इथम्बूत माहिती देत होता, थोडक्यात सांगायचं तर दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर ज्या काही सोयी आहेत त्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोयी रेल्वे स्टेशनवर असतात इथल्या, आमचं रिझर्वेशन बिझनेस क्लासच्या बोगीचं होतं, लोकल आणि लांबच्या टप्प्याच्या अश्या दोन प्रकारच्या रेल्वे आहेत इथे. लोकल ना जास्त सोयी नसतात, पण लांबच्या टप्प्याच्या रेल्वेच्या बोगीज डबल डेकर असतात, आणि वरचा मजला बिझनेस क्लास असतो तिथे चहा कॉफी फ्री मिळते. कुकीजपण असतात. एखाद्या हॉटेलच्या बाथरूमला लाजवेल एवढं स्वच्छ बाथरूम असत. आत बेसिन, टिशू पेपर, आरसा सगळं अगदी छोट्याश्या जागेत, दुसऱ्या बाजूला एक छोटी रूम असते, जर तुम्हाला फोनवर काही बोलायचं असेल तर तिकडे जाऊन बोलू शकता, दोन डब्यांच्या मध्ये काचेच्या रूम्स असतात तिथे तुम्ही शांतपणे बसून अभ्यस किंवा ऑफिसचं काम करु शकता, पूर्ण रेल्वेत एक डब्बा लहान मुलांसाठी असतो, तिथे घसरगुंडी असते, काही खेळ असतात लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी, लहान मुलांची गोष्टीची पुस्तक पण असतात आणि टेबल खुर्ची असते . एक पनिशमेंट रूम पण असते, जर मुल ऐकत नसतील तर तुम्ही त्यांना कोंडून ठेवण्याची भीती दाखवू शकता, मग एका बोग्गीत छानसं रेस्टोरंटपण असतं आणि तिथले रेट्स भरपूर असतात.
मिक्को आणि मी गप्पाटप्पा करत ताम्परे हून पासिला शहरात पोहोचलो, जाताजाता तो मला वेगवेगळी माहिती देत होता फिनलंड बद्दल, त्याच्या स्वतःबद्दल आणि कामाबद्दल. पासिलाला ट्रेन बदलायची होती, आणि तिथे मला माझं समान इकडून तिकडे नेण अवघड जाईल म्हणून तो आला होता. Joensuu उच्चार योएन्सु, योएन्सुला जाणारी ट्रेन अगदी मिनिटभर तिथे थांबली, समान वरती ठेऊन तो जाईपर्यत ट्रेन सुटली, मग तो पुढच्या स्टेशनला उतरून त्याच्या घरी गेला.
मग पुढचे पाच तास मी एकटीच होते, आयपॉडवर गाणी ऐकत, बाहेरचं रमणीय दृश्य बघतं प्रवास चालू होता, योएन्सु शेवटचा स्टॉप होता, गाडी कुठल्यातरी स्टेशनला थांबली होती, बाहेर बघितलं तर तिथे योएन्सु लिहील होत, मी पूर्ण गोंधळले, गाडीत अनाउन्समेंट वेगळ्याच गावाची केली होती आणि योएन्सु कसं आलं. समोर एक आजी आजोबा होते त्यांना विचारलं कि योएन्सु आलं का? हा शेवटचा स्टॉप आहे का? दोघाजण येस येस म्हणायला लागली. मी पटापट आवरून जायला लागले तर आजी म्हणाल्या गाडी योएन्सुला चाललीय आणि तो शेवटचा स्टॉप आहे, जीवात जीव आला, बाहेर बघितलं तर आमच्या गाडीचे डिटेल्स त्या डिजिटल बोर्डवर लिहिले होते. मग दोघांशी गप्पा मारत शेवटी योएन्सु ला पोहोचले. माझा मॅनेजर रेंने पाच वर्षाच्या त्याच्या लेकीला घेऊन दारात उभा होता, त्याच्या गाडीनी आम्ही माझ्या अपार्टमेन्टवर पोहोचलो, अपार्टमेंटचं रसभरीत वर्णन आणि माझी झालेली फजिती उद्या लिहिते. प्रवासानी खूप दमलीय आणि निद्रादेवी पुरती प्रसन्न झालीय. त्यामुळे शुभ रात्री माझ्यासाठी आणि तुम्ही सकाळी वाचाल त्यामुळे तुम्हाला शुभ प्रभात ….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा