फिनलंड ट्रीप डायरी १० नोव्हेंबर २०१४
फिनलंड हा देश क्षेत्रफळानुसार आपल्या देशाच्या एक दशांश आहे, पण लोकसंख्या खूपच कमी आहे. आपली एक अब्ज तर त्यांची फक्त साडेपाच लाख. प्रवास करताना दूरवर एकसुद्धा घर दिसणार नाही. आपल्यासारखा या लोकांना माणसं गोळा करण्याचा नाद नाही , एकटं राहायला सांगितलं तर आनंदानी राहतील, त्यामुळे बाहेरच्या देशातली लोकं खूप काही येत नाहीत इथे राहायला.
फिनलंडच्या दक्षिणेला खाडी आहे. पूर्ण पूर्व सीमारेषा रशियाला जोडली आहे. उत्तरेला नॉर्वे आहे आणि पश्चिमेला बोथनियाची खाडी आणि स्वीडन देश आहे.
हेलसिंकी जिथेपर्यंत माझं विमान होतं ती फिनलंडची राजधानी, सगळ्यात मोठ शहर क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार. राज्य अशी संकल्पना नाहीच इथे. सगळी शहर आहेत, इथे गावं किंवा खेडी पण नाहीत. सगळी शहरच. लहान शहर आणि मोठी शहर, छोटं असो वा मोठं, सोयी सगळीकडे सारख्याच.
जगातल्या सगळ्यात आनंदी देशांमध्ये तिसरा आणि महागड्या देशांमध्ये बारावा क्रमांक फिनलंडचा लागतो. पूर्वी इथला मुळ व्यवसाय लाकूडतोड अर्थात ट्री हार्वेस्टिंग आणि त्याच्याशी निगडीत उद्योगधंदे म्हणजेच पेपर उद्योगासारखे उद्योग चालायचे. देशाचा एक त्रितौश भाग जंगलांनी व्यापला आहे आणि त्यातल्या जवळ जवळ ऐंशी टक्के जागेवर झाडांची शेती होते. पण गेल्या दोन दशकांपासून इथे आपल्यासारखाच आयटी कंपन्यांचा जोर आहे आणि वाढत्या महागाईमुळे जास्तीत जास्त लोक आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणंच पसंत करतात.
आता मी राहतीय ते शहर म्हणजे Tampere, उच्चार टाम्परे असा नसून ताम्परे असा आहे, इथे ट हा उच्चार वर्ज आहे बहुदा, कारण मी टाम्परे म्हटल्यावर लोक ओह्ह ताम्परे याह असं म्हणतात. तर ताम्पेरे हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. इकडे चार प्रकारचे ऋतू आहेत, विंटर, स्प्रिंग, समर आणि ऑटम. हवामान खूप भरवश्याच असलं तरी वर्षभरात अधिक तीस ते उणे तीस डिग्री सेल्सिअस तापमान बदलत.
साधारण अधिक सहा ते उणे सहा डिग्री सेल्सिअस तापमानाला खूप थंड वारं वाहतं, त्यामुळे थंडी जास्त वाजते पण तापमान उणे सहा च्या खाली गेलं कि वारं वहाण कमी होतं. सध्या रस्ते ओले आहेत कारण मागच्या आठवड्यात बर्फ पडल्यामुळे आता तो बर्फ वितळून रस्ते ओले करण्याच काम करतोय त्यामुळे इथल्या लोकांसाठी हा जरा नावडीचा काळ आहे. पण त्यांच्यामते अजून एका आठवड्यात वारं वाहायचं कमी होऊन स्नो फॉलला सुरुवात होईल, दिवसभर हवा जर ढगाळच आहे, तुरळक पाऊस पण आहे, उजेड साधारण नऊ वाजता पडतो आणि संध्याकाळी चार वाजता गद्दद अंधार पडतो. नंतर नंतर दिवस एक किंवा दोन तासांचाच असतो पण सगळीकडे बर्फ असल्यामुळे त्यावर पडणारा उजेडही परावर्तित होतो त्यामुळे जरा जास्त प्रकाश वाटतो.
वाचणाऱ्याला कदाचित भूगोलचं पुस्तकं वाचतोय असं वाटत असेल तर दिलगीर आहे पण तुम्हाला बोअर करण्याचा उद्देश नसून दिवसभरात मिळालेली माहिती तुम्हाला सांगण्याचा उदात्त हेतू आहे.
बाकी आजचा दिवस छान होता. दिवसभर माझ्या प्रॉडक्ट इंजिनिअर पेरत्तूसोबत होते. गोरा घारा माणूस सव्वासहा फुट उंचीचा त्यामानानी किरकोळ बांध्याचा आहे, शांत स्वभावाचा आणि करारी आहे. गेले १५ वर्ष तो इथे काम करतो त्याआधी दोन एक वर्ष दुसर्या कुठल्याश्या कंपनीत काम करत होता. त्या अर्थी साधारण चाळीस वर्षांचा असावा. त्याला दोन मुलं आहेत छोटा ५ वर्षाचा आणि मोठा ७ वर्षाचा. मुलांसोबत फुटबॉल खेळताना गुढग्याला लागल्यामुळे थोडासा लंगडत होता. पहिले एकदोन तास स्वतःबद्दल आणि स्वतःच्या देशाबद्दल माहिती दिल्यावर कंपनी आणि कंपनीतल्या माणसांची ओळख करून दिली. त्यातल्या बऱ्याचशा लोकांसोबत ईमेलच्या माध्यमातून काम केल्यामुळे मला त्यांना आणि त्यांना मला भेटून आनंद झाला. नंतर मशीन शॉपमध्ये गेल्यावर ती अवाढव्य मशीनरी बघून कोण आनंद झाला आणि असं जाणवलं कि "याचीसाठी केला होता अट्टाहास".
नंतर लोकोमन्कातु नावाच्या कंपनीच्या कॅन्टीन मध्ये गेलो. माझ्यासोबत त्यानीही सलाड आणि मिल्क घेतलं. त्यासोबत घावन किंवा गोड धीरडयासारखा पदार्थ खाण्याचा त्यांनी आग्रह केला आणि ते घावन खरोखर चविष्ठ लागलं, पण एवढ सलाड खाल्यानंतर अजुन घावन घेऊन खाणं आधाश्यासारखं वाटेल म्हणून त्यांनी आग्रह करूनही परत घेतलं नाही आणि मनात ठरवलं कि उद्या आपण हेच घ्यावं. पण त्यांनी माझ्या मनातल ओळखून मला सुचवलं कि आजचं खा उद्या कदाचित हा पदार्थ मिळणार नाही, पण एकदा नको म्हटल्यामुळे मी पुन्हा नाही घेऊ शकले. नंतर माझ्या कामाबद्दल बोलणं झाल्यावर त्यांनी मला कालेवी कोस्की नामक म्हाताऱ्याकडे एका तसाभरासाठी सोपवलं, त्यानी मग मला तासभर मनसोक्त पकवलं, मी पण मोठ्या आनंदानी पकवून घेतलं आणि संध्याकाळच्या चार वाजता टॅक्सीने हॉटेलवर आले.
इथे रात्रीचे दहा वाजलेत आता त्यामुळे झोपते, सहा वाजताच येणारी झोप मी लिहिण्याच्या निमित्तानी लांबवली त्यामुळे उद्या निदान दोन नी चार ला जग येणार नाही पहाटे, भेटू पुन्हा. उद्याच्या डायरी सोबत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा