घर सोडताना

इथे सहकारनगरला आलो त्याला जवळपास पाच वर्ष झाली. दिवस वाऱ्यासारखे भुर्र उडून गेले. अनय वर्षाचा होता जेमतेम आणि आर्या तिसरीत. 


नवी शाळा, नवी जागा, नव्या मैत्रिणी, कसं जुळवून घेईल ती अशी काळजी वाटत होती. पण तिच सगळ्यात लवकर रुळलेली. शाळा आवडली, छान मैत्रिणी मिळाल्या जिवाभावाच्या. मी पुणेकर असा अभिमान तर काहीच्या काही वाढला. अनय तर इथलाच, त्याला लहानपण म्हटलं की या घराच्या आठवणी येतील आयुष्यभर. बाळ होता तेव्हा खिडकीत उभा राहून पोपट बघायचा. 

लग्नापूर्वी आम्ही काही निमित्तानी सहकारनगरात यायचो, इथली झाडं, रस्ते, घर यांच्या प्रेमात पडलो. मला तर आमच्या प्रेमाचा साक्षात्कारच तळजाईला येऊन झाला. त्यामुळे सुप्त मनात सहकारनगर विषयी ओढ होती, आणि दहा वर्ष खराडी, मुंढवा, हडपसर सारख्या रुक्ष भागात राहिल्यावर ऑफीस लांब असूनही पाच वर्षांपूर्वी सहकार नगरात आलो. 

हे राहातं घर भाड्याचं आहे, पण इतके वर्ष इथे राहिल्यावर घराला जीव लावला नाही तरच नवल. त्यात जेव्हा घर बघितलं तेव्हाच प्रेम जडलं घरावर. दारात स्वामींचा फोटो, मोठाच्या मोठा हॉल आणि सगळ्यात आकर्षण म्हणजे हि मोठी गच्ची, गच्चीत झुला, आणि झुलत बसलं कि डोळ्यांना सुखावणारी फक्त हिरवळ, मोठी मोठी डेरेदार झाडं, ना गाड्यांचे ना माणसांचे आवाज, फक्त पक्षांचा किलबिलाट आणि थोडीफार कुत्रा मांजरांची गुरगुर. 

ऑफीस कॉल वर मला तर एकानी विचारलं पण होतं, तुम्ही कुठे जंगलात राहिला गेलात का, नेहमी पक्षांचे आवाज येतात. 

आणि घर असंच  आहे, जसं की जंगलात राहतेय, किंवा थंड हवेच्या ठिकाणी, निसर्गात. 

घरातल्या प्रत्येक जागेशी आपलं वेगळंच नातं जुळतं, त्यात नशिबानं बराचसा काळ घरातून काम करता आलं. ही माझी कामाची, लिखाणाची खिडकी, माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. 

कामाची आणि लिखाणाची जागा 

स्वयंपाकघर म्हणजे माझी दुसरी हक्काची जागा, सुरवातीला डावं उजवं गोंधळ उडायचा, तो जाऊन इतकं सवयीचं कधी झालं कळलं पण नाही. 


हडपसर म्हणजे पुण्याचं दुसरं टोक, आपली माणसं दिसणं दुरापास्त, त्यामुळे पाहुणे कधीतरीच भेटायचे, त्यामुळे तीन माणसांच्या पेक्षा जास्त स्वयंपाक करायचा म्हणजे चांगलीच भंबेरी उडायची, पण सहकार नगर मध्ये माणसात आल्यामुळे भेटीगाठी वाढल्या, आणि स्वयंपाक, स्वयंपाकघर आणि वेगवेगळ्या पदार्थांशी चांगली दोस्तीच झाली. 

गच्ची मोठी असल्यामुळे टेरेस गार्डन ची हौस पण पुरेपूर भागवली, सध्या गार्डन मध्ये चाफा, तीन प्रकारचे जास्वनद, सदाफुली, स्वस्तिक, गुलाब, लिली, मोगरा, मिरची, कढीपत्ता, लिंबू, कोरफड, ओवा, केणी, आघाडा, थोडी शोभेचीअशी झाडं लावली आहेत. सकाळी व्यायाम करायला माझी हक्काची जागा ही, ही अशी सकाळ मिळाली की दिवस एक नंबर. 

या घरानी, खूप छान आणि सुंदर आठवणी दिल्या. आनंद दिला, अनुभव दिला, प्रेम दिलं, सुख दिलं, भरभराट दिली, आरोग्य दिलं, मैत्रिणी मिळाल्या, शेजार छान मिळाला, मुलं मोठी झाली, मी पण त्यांच्यासोबत परिपक्व बनत गेले, या घराबरोबर एक अतूट नातं तयार झालं. 

आज पटतच नाहीये, इथे शेवटची रात्र आहे, भरून आलंय, भिंतींवरून, दारांवरून हळुवार हात फिरवत भावुक होतेय. अंतःकरण जड झालंय आज. एकीकडे नव्या घराची ओढ आणि दुसरीकडे राहिलेल्या जागेवरच प्रेम, या घराचे मनपूर्वक आभार. आणि खूप खूप प्रेम.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४