फिनलंड ट्रीप डायरी ११ नोव्हेंबर २०१४

 आज पहाटे चार वाजताच जाग आली, म्हणजे तिकडच्या साडेसातला, बॉडी क्लॉक, काही इलाज नाही, मग काही प्रयत्न करूनही झोप आली नाही. सरळ उठून थोडी योगासनं  केली, आणि आवरून ऑफिसला गेले, आता इथलं गार वारं जरा सवयीचं झालंय त्यामुळे खूप हुडहुडी भरत नाही. अर्थात पूर्ण पॅक होऊनचं बाहेर पडायला लागत. ऑफिस दोन तीन किलोमीटरवरच आहे, पण पावसामुळे चालत जण काही शक्य नाही.

सकाळी हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी नाश्ता मिळतो. केलॉग्सचे दोन प्रकार असतात आणि त्याबरोबर स्किम्ड मिल्क तेही थंड गार, गरम गरम उकळता चहा बहुतेक मिळणारच नाही महिनाभर प्यायला. मशीनचा चहा कॉफी पिऊन काही समाधान नाही होत. सलाड असतं सकाळी सकाळी, ते काही मी घेत नाही. अँपल केक छान लागतो, कुकीजपण चांगले लागतात, आणि फळ असतात टोपलीत भरून ठेवलेली. लोकं जाताना एक फळ उचलतात नंतर खायला.  मी पण तसंच करते, म्हणजे संध्याकाळची सोय होते. 


 
नुसतं सलाड खायला नको म्हणून पेरत्तूने मला दुसऱ्या रेस्टोरंटमध्ये नेलं. म्हणाला, "आज, इकडं तुला गरमागरम सूप पिता येईल", पण सुपात नेमके मीटचे तुकडे होते, मग काय सलाड होतंच, सोबत थंडगार कॅन मधलं दुध, आणि वाळलेला पाव बटरसोबत. मेयोनीज असतं सलाड सोबत त्यामुळे टेस्टी लागत जरा, काल कोबी होता मेयोनीज सोबत आज बीट होतं.

संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर जरा चालायला गेले. दोनतीन किलोमीटर चालले. जवळ हॉटेलला लागूनच रेल्वे स्टेशन आहे. जरा पुढे गेल्यावर जुनी चर्च आहे. एक मोठा मॉल आहे जवळचं, त्या मॉल मध्ये हिंडले आणि तिथेच सबवे मध्ये खाल्लं, फोटो काढले, एक आर्या एवढी मुलगी आणि तिची आई होती. आईला विचारलं, "एक फोटो काढू का?" तरं ती एवढी खुश झाली. लगेच तिनं मुलीच्या अंगावरचं  जाडजूड जर्किन काढलं, केस विंचरून मस्त हेअरबॅण्ड लावला, मग मी मारिया चे दोन तीन फोटो काढले. 


ख्रिस्मस साठी मॉल सजवलेत छान. वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या होत्या विकायला. परत वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीटींग्स आणि गिफ्ट्स नि दुकान भरली होती. लोकं आत्तापासूनच ख्रिस्मसची खरेदी चालू करतात. मॉलच्या एका गेट मधून आत गेले आणि दुसऱ्याचं गेटनी बाहेर आले. साधारण अंदाज घेत परत हॉटेल कडे चालत होते आणि दुसऱ्याच बाजूला माझ्या हॉटेलचा मोठा बोर्ड दिसला, त्यामुळे त्याबाजूने गेले तर ते माझ हॉटेल नव्हतंच मग टॅक्सी ड्राइवरने  म्हटलेलं आठवलं कि शहरात ४ कुमुलूस हॉटेल्स आहेत, मग लोकांना विचारात, बागीच्यांचे, रस्त्यांचे, तलावाचे आणि वेगवेगळ्या पुतळ्यांचे फोटो काढत काढत हॉटेलवर पोहोचले.  उद्या दोन ट्रेन बदलून दुसऱ्या शहरात जायचंय, २ तास ऑफिसला जाणार आणि मग प्रवास चालू होईल. ५ तासाचा प्रवास आहे साधारण. माझा जुना बॉस ट्रेन बदलेपर्यंत सोबत असेल आणि तिकडे पोहोचल्यावर आत्ताचा बॉस घ्यायला येईल, आणि मग नवीन गाव, नवीन जागा, नवीन हॉटेल, नवीन माणस, नवीन ऑफिस नवीन अनुभव… तोपर्यंत अलविदा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४