प्रत्येक वेळी धरित्री वेगवेगळी दिसते. आज धुकं पांघरून घेतलय तिने. या तिच्या वेगवेगळ्या रूपाचा अनुभव ज्यानी त्यानीच घ्यायचा आपापला. छान वाटतंय खूप. आयुष्यातला वेगळाच अनुभव घ्यायला उड्डाण करतीय आज.
घराचे पाश काही दिवसांसाठी मागे सोडून घेतीय उड्डाण. प्रणव, आर्या, दोन्ही आईबाबा, सगळ्यांचा इतका छान आधार आहे, मला जराही काळजी नाहीये घरची.
आयुष्यातला पहिला इतका लांबलचक आणि एकटीने केलेला प्रवास.थोडी धाकधूक, थोडा आनंद, थोडं एकटेपण, थोडं कौतुक, पण छान पार पडला.सुरवात तरी चांगली झाली.
विमानातला सगळा नवा अनुभव. काही अनुभवी तर काही माझ्यासारखे नवखे देशी-विदेशी सहप्रवासी, पॉलिश्ड हवाईसुंदरी, भव्य विमानतळ, जेवण, चहा, कॉफी, ती समोर लावलेली स्क्रीन, बाहेरचं शूट करणारा कॅमेरा, विमान कुठून उडतंय हे दाखवणारा नकाशा सगळंच मनाला भावणार.
२-३ वर्षांच्या लहान मुलांना पाहून सारखी आर्याची आठवण येत होती. ती मुलं खेळत होती तेव्हा वाटत होत कि ती हवी होती, पण जेव्हा हीच पोरं कंटाळून रडायची तेव्हा वाटायचं बर आहे ती नाही आहे ते.

भारतातून इकडे येताना विमान दिल्लीवरून पहिल्यांदा हरियाना पंजाब वरून पाकिस्तानात जातं, विमानाबाहेर कॅमेरे लावले असतात त्यामुळे खालचं दिसतं थोडफार, आणि सारखे नकाशा दाखवत असतात कि विमान कुठून जातंय. विमानानं भारताची हद्द पार केली, तेव्हा खुप छान वाटलं, अरे वा! आपण भारताबाहेर पडलोय. मनातल्या मनात खूपदा या धरणीमातेला सांगितलं कि मी लवकर परत येणार आहे.
तर हद्द सोडल्यावर पहिल्यांदा पाकिस्तान लागलं आणि मनात खूप विचार यायला चालू झाले जर भीती पण वाटली. लाहोर, इस्लामाबाद आणि पेशावर झालं कि पाकिस्तान संपलं आणि अफगाणिस्तान चालू झालं, काबुल दिसलं आणि सगळा बर्फाळ प्रदेश चालू झाला. दूरवर नुसत्या हिमाच्छादित पर्वतरांगा दुसर काहीच नव्हतं, जमिनीपासून जवळजवळ सडे अकरा किलोमीटर उंचीवर होतं विमान, आणि बाहेरचं तापमान मायनस पंचावन्न ते मायनस साठ डिग्री सेंटीग्रेट. विमानात तापमान मेंटेन असल्यामुळे खरतर विश्वासच बसत नव्हता, पण खाली एवढा बर्फ बघितल्यावर पटायला लागलं, मग पुढचे काही आशियायी देश सोडल्यावर विमान रशियात शिरलं मॉस्को द कॅपिटल ऑफ रशिया, स्क्रीनवर तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती झळकायला लागली दाखवतात आणि रशिया ओलांडल्यावर फिनलंडची खाडी लागली म्हणजेच गल्फ ऑफ फिनलंड आणि परत सीटबेल्ट बांधून सरळ बसण्याच्या सूचना यायला लागल्या, कारण आता विमान जमिनीवर उतरणार होतं आणि छातीत धडधड चालू झाली, हवेच्या दाबत सतत बदल होतं गेल्यामुळे कान बंद झाले, घश्याला कोरड पडली, समोर स्क्रीनवर पुढच्या फ्लाईटचे अपडेट यायला लागेल, विमान साडेअकरा किलोमीटर उंचीवरून एक एक किलोमीटरनि खाली यायला लागलं तसं टेम्परेचर मायनस चं प्लस व्हायला लागलं आणि एकदम खड्ड झालं, झालं विमान जमिनीवर आलं म्हणजे मी पोहोचले फिनलंडला वाह! असं वाटलं…
Mast
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामस्तच जमलं आहे हे लिखाण..ओघवतं
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूपच छान, अगदी विमानात बसून आल्यासारखं वाटले
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा