फिनलंड ट्रीप डायरी १९ नोव्हेंबर २०१४
इथे टॅक्सी सर्व्हिस खूप भारी आहे, प्रत्येकाकडे फोन नंबर असतात यांचे, फोन केल्याच्या दोन मिनिटाला टॅक्सी हवी तिथे हजर, माझ्या बॉसने अशाच एका टॅक्सी कंपनीचा नंबर मला देऊन ठेवलाय. त्यांना माझ्या येण्याजाण्याच्या वेळा सांगून ठेवल्यात, डॉट त्याच वेळेला टॅक्सी दारात उभी असते. एक मिनिट उशीर नाही कि एक मिनिट लवकर नाही. त्याहीपेक्षा भारी म्हणजे एकदा सांगितलेल्या वेळेच्या १० मिनिटं मी उशिरा पोहोचले तर टॅक्सी निघून गेली. आपण टॅक्सी जवळ गेलो कि ड्राइव्हर, हसून, अदबीनं दार उघडतो आणि हातात वजन असेल तर स्वतःहून डिक्कीत टाकतो, प्रत्येक टॅक्सीत स्वाईप मशीन असतंच, शिवाय स्क्रीन असते छोटीशी, पत्ता माहित नसेल तर लगेच मॅप काढून चेक करतात, आणि उतरतानाही पळत येऊन दार उघडतात आणि कितोज म्हणतात.
ऑफिसमध्ये आता स्पेशल अटेन्शन मिळणं कमी झालंय, बॉस त्याचा तो बिझी असतो, म्हणून त्यांनी टीम मेंबरसना सांगितलं कि हिला काय हवं नको बघा. टीम मधल्या एकानी दाखवलं कि कॉफी प्यायला कुठे जायचं, कधी मिळते, झालं त्याचं काम. मला वाटलं कि आजपण हा बोलवेल कॉफी प्यायला जाताना. कसलं काय , नऊ वाजले कि एकेकजण उठून जातात, पॅन्ट्रीमध्ये फिनिश न्यूज पेपर वाचत वाचत कॉफी पितात फार तर मोबाईल चेक करतात आणि परत जागेवर येऊन काम करतात. नाहीतर आम्ही भारतात, सगळ्यांना चला चला करून दंगा करत कँटीनमध्ये जाणार, इथे लोक उठून गेलेले कळत पण नाही, कोणाचा काही आवाज नाही, सगळी शांतता. शेवटी एकाला सांगितलं कि तू जाताना मला हक मार. पॅन्ट्रीमध्ये गेलं तरी मीच काहीतरी विषय काढून बोलते सगळ्यांशी, नाही म्हणायला मुली बायका असल्या कि आवाज असतो, पण त्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या आहेत.
पण बोलायला लागल्यावर कळलं कि इंडिया बद्दल लोकांच्या मनात पूर्वग्रह आहेत, प्रश्न भारी विचारतात, इंडियामध्ये ट्रॅफिक रुल पाळत नाहीत ना लोकं, ऍक्सीडेन्ट खूप होतात ना, तिथे चोवीस तास इलेक्रीसिटी नसते ना, सगळ्यात आश्चर्य वाटल जेव्हा एकानी प्रश्न विचारला कि इंडियातल्या ऑफिसमध्ये मुलगी आहेस म्हणून बरोबरची वागणूक मिळते का? आणि मुलींना शिकायचं असेल तर खूप समाजाचा विरोध पत्करून शिकायला लागत का? हे लोक भारतातल्या बातम्या पाहतात तेव्हा त्यांना असंच काहीतरी पाहायला मिळत म्हणे, खूप विचार करून उत्तरं द्यायला लागतात. पण बर वाटत कि प्रश्न विचारणाऱ्या बरोबर ऐकणाऱ्या चार जणांचे भारताविषयीचे चुकीचे समज दूर झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा