फिनलंड ट्रीप डायरी १३ नोव्हेंबर २०१४

रात्रीचे आठ वाजलेत आणि बाहेर तापमान फक्त उणे तीन डिग्री सेल्सिअस आहे. नखशिकांत उबदार कपडे चढवून लिहायला बसले आहे. बाहेर पडलं कि नाक, गाल आणि हातापायाची बोटं बधिर होतात. 

योएनसू, जिथे मी काल संध्याकाळी पोहोचले ते शहर, शहर कसलं एक टुमदार गावं. मी राहतेय त्या भागाचं नावं आहे हॉलिडे लिंनून लहती कॅम्प, लहती म्हणजे किनारा, नदी किनाऱ्यावरचा कॅम्प, त्यांची बरीच मोठी जागा आहे आणि त्यात वीस पंचवीस अपार्टमेंट्स आहेत, अपार्टमेंट्स म्हणजे एक छोटी माडी असलेली दोन जोडलेली बैठी घरं.


 

दारातुन आत आल्यावर डावीकडे एक कोनाडा आहे, त्यात हँगर लावलेत, बाहेरून आलं कि ओव्हरकोट, जर्किन तिथे काढून ठेवायचं,आपल्यासारखे चप्पल बुट काढून मगच घरात प्रवेश करायचा. 

त्या शेजारी प्रशस्त बाथरूम, त्यात आत लपलेली आणि एक खोली, तोच फिनिश लोकांचा सुप्रसिद्ध सौना. खोलीत एक लाकडी बेंच असतो आणि तिथे बसून स्टीम बाथ घ्यायचा. फिन्निश लोकांच्या घराघरात ही सोय असते म्हणे, मायनस पाचच्या खाली टेम्परेचर गेलं कि सौना घेणं आवश्यक असतं, मला पहिल्यांदा हा शौक आहे अस वाटलेलं.



उजवीकडे एक बेडरूम, तिथे जोडलेले दोन बेड, एक मोठं  कपाट, लागून एक टेबल.  



सरळ पुढे आलं की लिविंग रूम जिथे एल आकारातला सोफा सेट, समोर कॉफी टेबल आणि टीव्ही. 



किचनमध्ये सोफा सेट ला पूरक असा एल आकारातला ओटा, त्यावर फिनिश लोकांना आवश्यक असलेल्या सगळ्या सोयी, म्हणजे इलेक्ट्रिक स्टोव्ह, फ्रिज, डिश वॉशर, टोस्ट मेकर, कॉफी मेकर, टी मेकर, सिंक, चिमणी, अव्हन, मायक्रोवेव्ह आणि सहा माणसांचा स्वयंपाक बनवून त्यांना जेवायला टेबल खुर्ची आणि भांडी अर्थात त्यांच्या पद्धतीप्रमाणे. 



लिविंग रूमला लागून एक सडा जिना, चढून गेल्यावर सज्जा तिथे दोन कॉट. 



एका अपार्टमेंटमध्ये अशी दोन घरं, आणि प्रत्येक अपार्टमेंटमध्ये साधारण १५ २० फुटाची जागा, आणि भोवताली पूर्ण हिरवळ आणि पाईनची उंचच उंच झाडं. दारात सेन्सरवर सुरु होणारा दिवा आहे, आपण घराजवळ आलो कि तो आपोआप लागतो, अशा या मोठ्या घरात मी एकटी. 

घरातल्या निम्म्या गोष्टी मला वापरता येत नव्हत्या, माझा मॅनेजर काल जेव्हा सोडायला आला तेव्हा त्यांनी पटापट सगळं कसं वापरायचं ते सांगून गेला. 

खुप भूक लागली होती आणि धाडस केल्याशिवाय काही खायला मिळणार नव्हतं, घाबरत घाबरत तो इलेक्ट्रिक स्टोव्ह सुरु करून त्यावर मॅगीसाठी एक भांड ठेवलं, दहा मिनिटं झाली तरी काही पाणी गरम होईना. मग आपण आपला गॅस कसा मोठा ठेवतो तसं करून बघूया म्हणून तो नॉब जरा फिरवला आणि पाणी उकळायला लागलं, बिचकत बिचकत माझी मॅगी एकदाची बनली. नॉब बंद केला तरी त्या स्टोव्हचा दिवा काही केल्या बंदच होईना, मग मात्र माझी सटारली, मी रिसेप्शनला फोन केला. त्यात त्या मुलीला माझा प्रोब्लेम काही कळेना, तिला म्हटलं आता तू सरळ इकडे ये. तरी १५ मिनिटांनी ती आली आणि तोपर्यंत तो दिवा बंद झाला. तरी तिच्याकडून सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती करून घेतली. 

सगळं आवरून कधी झोपीन असं झालं होतं खरतरं, पण एवढ्या मोठाल्या घरात मला काही झोप लागेना, त्यात स्प्रिंग असलेला बेड, शेवटी गादी खाली टाकून घेतली. मग थंडीच वाजायला लागली. कारण बाहेर टेम्परेचर मायनस दोन तीन होतं. मग स्वेटर, मफलर, सॉक्स, तीनचार ब्लॅंकेट्स एवढं सगळं घेऊन अखेर झोपेच्या आधीन झाले.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४