फिनलंड ट्रीप डायरी ०९ नोव्हेंबर २०१४
हा देश स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आणि दुसऱ्याचे आभार मानायला लोक तत्पर आहेत. बसमध्ये ड्राइवरला मोई म्हणजे हॅलो म्हणून लोक आत येत होते आणि खाली उतरताना दोघाही एकमेकांना कितोज म्हणजे थँक यु म्हणत होते. पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यातही बस हा खरोखर कौतुक वाटावा असा अनुभव आहे.
तरुण मुली बार्बीडॉल सारख्या गोऱ्या, नकट्या आणि सोनेरी केसांच्या आहेत. त्यांच्या फरच्या ओव्हरकोट मध्ये आणि गमबूट मध्ये खूप क्युट दिसत होत्या, मुलं खूप धिप्पाड आहेत. माझ्याशेजारी एक सोळा सतरा वर्षांचा मुलगा बसला होता आणि त्याला पाहून मला हॅरी पॉटर मधल्या हॅग्रीडची आठवण झाली.
हेलसिंकी फिनलंड ची राजधानी सोडून पन्नास साठ किलोमीटर बाहेर पडल्यावर, रस्त्याच्या कडेला पांढरे पांढरे ढीग दिसायला लागले. आपल्याकडे कसे कचऱ्याचे ढीग असतात न जागोजागी, तसे हे पांढरे ढीग होते, थर्माकोल वाटत होता तो. असा हा बर्फ मला पाहायला मिळाला. शेजारच्याला विचारलं कि आजच स्नो फॉल झाला का? तर त्यांनी जरा गोंधळून नो नो म्हटलं आणि पुढे काही बोललाच नाही. बहुतेक त्याला इंग्लिश येत नसावं किंवा माझं इंग्लिश कळलं नसावं.
एका बस स्टॉपवर एक मुलगी आणि एक मुलगा होता, बस तिथे थांबल्यावर एकमेकांनी लॉन्ग किस केलं आणि मग ती मुलगी गाडीत चढली, त्यांची किस होईपर्यंत ड्राइवर शांतपणे थांबला होता, मला जरा गम्मतच वाटली, दोन मिनिटं भारतात असं चित्र डोळ्यासमोर उभं करून बघितलं.
हेलसिंकित बस मध्ये बसले तेव्हा तीन वाजले होते आणि दहा डिग्री टेम्परेचर होतं. उजेड होता चांगला. पण तांपेरे मध्ये येईपर्यंत सहा वाजले होते आणि गडद्द अंधार झाला होता आणि टेम्परेचर सहा डिग्री झालं होतं, थंड वारं सुटलं होतं.
बसमधून उतरून ओव्हरकोट घालेपर्यंत हुडहुडी भरली चांगली, हॅन्ड ग्लोव्हजपण घातले लगेच, टॅक्सी स्टॅन्डपर्यंत चालत गेले, टॅक्सी मिळाली एक दोन मिनिटात, हॉटेल पत्त्याचा कागद काढून दाखवताना हॅन्ड ग्लोव्हज काढायला लागले आणि थंडीमुळे हात असा थरथरायला लागला कि बसं, टॅक्सी ड्राइवरलाच सांगितलं शेवटी कि कागद उघडून बघ. हॉटेल जवळच होतं. तरी अकरा युरो झाले, म्हणजे साधारण नऊशे रुपये. हॉटेल खूप जुन्या पद्धतीच वाटतंय. रविवार रेस्टोरंटस सात वाजताच बंद होतात त्यामुळे लगेचच खायला गेले. रेस्टोरंटसमध्ये जाऊन जेवणं एकंदरीत अवघड वाटतंय, कारण एकतर पदार्थांची नावं कळत नाहीत आणि सारख ड्रिंक कुठलं आणून देवू म्हणून विचारतात, वेटर मुलीच असतात, काल फक्त टोमॅटोसूप घेतलं आणि तेपण काही खास आवडल नाही. दिवसभर दमल्यामुळे लगेच झोप लागली मौमाऊ गादीवर, पण भारतातल्या सकाळच्या सहा वाजताच जाग आली, इकडे तेव्हा फक्त अडीच वाजलेले पहाटेचे त्यामुळे परत झोपले. पणदोन तासांनी परत जाग आली, मग म्हटलं लिहायला सुरुवात तरी करू नंतर बघू किती जमतय ते.
पण बोलायला कोणीच नाही आणि बाकी वेळ घालवायचं साधन नाही त्यामुळे लिहीन रोज.
आज मिक्को, माझा जुना मॅनेजर घ्यायला येणार आहे त्यामुळे तयार होऊन बसते आता. जाम भूक लागलीय, बघूया नाश्त्याला काही ऑर्डर करण्यासारखा आहे का ते. तोपर्यंत बाय.
खूपच छान असेच लिहीत राहा all the best
उत्तर द्याहटवा😊
हटवा😊
हटवा