फिनलंड ट्रीप डायरी १४ नोव्हेंबर २०१४



एवढ्या दूरवर अनोळखी जागेत आणि अनोळखी लोकांमध्ये, सगळे घरचे पाश मग ठेवून अपण जेव्हा एकटेच येतो तेव्हा त्यामागे खूप विचार, महत्वाकांक्षा आणि काहीतरी ओढ असते. अर्थात त्यामागे कंपनीची गरजही असतेच. कारण त्याशिवाय ते आपल्यावर एवढा खर्च का करतील? ती ओढ म्हणजे आपण ज्यावर एवढी वर्ष काम करतोय ते मशीन, फॅक्ट्री, ज्यांच्यासोबत रोज कॉल करून बोलतो ती माणसं. खरंच येण्याचं सार्थक झालं असं वाटलं. कंप्युटरसमोर बसून माउसच्या एका क्लिकने हवं तसं फिरणारं मशीन एवढं अवाढव्य आहे, आणि त्याला ग्राहकापर्यंत जायला एवढ्या प्रोसेस आणि एवढ्या माणसांच्या कष्टाचा सहभाग असतो हे माहित असलं तरी प्रत्यक्ष बघणं खरंच एक सोहळा बनला माझ्यासाठी, आपण स्वतः दूरवर भारतात बसून बनवलेला पार्ट, इथे तयार होताना किंवा झालेला बघितला आणि असा ऊर भरून आला. इथे यानी, नावाचा माझा होस्ट आहे, त्यानी, मी ज्या ग्रुपमध्ये काम करते त्या सगळ्यांची मला ओळख करून दिली, आणि शॉप फ्लोअरवर पहिल्यांदा हिंडताना सगळी लोकं हातातलं काम बाजूला सारून मला हाय, हॅलो किंवा मोरो म्हणत होती, आणि मग यानीला विचारायची माझ्याविषयी माहिती, फिनिश भाषेत, मग त्यांच्या संभाषणातलं मला इतकाच कळायचं पूर्वनो…… इंडिया…., मग आम्ही पुढे जायचो, खूप भारी वाटत होतं. लाईनवर खूप म्हातारे म्हातारे स्त्री-पुरुष कामाला आहेत, आणि सगळे धिप्पाड धिप्पाड आहेत, इथे सुरक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे कंपनीत गेल्यागेल्या मला ब्रँड न्यू सेफ्टी शूज, सेफ्टी जॅकेटस, गॉगल्स, हातमोजे, इअर बड्स देण्यात आलं आणि मजा म्हणजे माझ्यासारख्या हट्याकट्या मुलीला, सगळीकडे माझ्या साईझचा, सगळ्यात छोटा नंबर शोधायला लागला.



आज सकाळी विचार केला कि जरा कंपनीचे पैसे वाचावूयात कारण टॅक्सीने येण्याजाण्यासाठी येउन जाऊन सहा किलोमीटर आहे त्याचे तीस पस्तीस युरो होतात म्हणजे साधारण पंचवीसशे रुपये दिवसाला, म्हणून सायकलनं जायचं ठरवलं, इथे हॉटेल मध्ये राहणाऱ्याला सायकल फ्री आहे, नाहीतर सगळीकडे पाच युरो दिवसाला भाड्यानी मिळते, तर मी सकाळी माझा ड्रेस, जर्किन, ओव्हरकोट, हॅन्ड ग्लोव्हज, मफलर, कॅप, हेल्मेट, सॉक्स, शूज असा पेहराव करून, लॅपटॉप आणि कॅमेरा असा सगळा लवाजमा घेऊन सायकल वरून निघाले, इथल्या सायकलना आपल्या इथल्यासारखा वेगळा ब्रेक नाही पायडल मग घेतलं कि ब्रेक लागतो आणि घंटापण नाही, तर अशी माझी स्वारी कशीबशी अर्धा किलोमीटर गेली आणि अशी काही मी गारठले कि बस, टेम्परेचर होतं फक्त उणे तीन डिग्री सेल्सिअस. माझं नाक प्रचंड झोंबायला लागलं आणि गाल चुरचुरायला लागले, हातापायाची बोट बधिर झाली, त्याशिवाय इतकी वर्ष सवय मोडल्यामुळे दमायला झालं, माझाच मला राग आला कारण खूप बायाका पुरुष मस्त सायकल चालवत माझ्या पुढे निघून गेले. सायकलवरून उतरून टॅक्सी बोलावली हॉटेल वर. आणि परत हॉटेल कडे फिरून खर्चाचा परत विचार करणार नाही असं ठरवून टॅक्सीने ऑफिसला पोहोचले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४