फिनलंड ट्रीप डायरी २३ नोव्हेंबर २०१४
काल जरा मूड होता, अस वाटत होत का आलो आपण एवढ्या लांब, एकटेच?, आपल्या माणसांपासून दूर, जिथे माणसच नाहीत आणि बाहेरपण पडता येत नाही, कारण दूरवर नुसता बर्फ आणि गोठणारी थंडी, खरं तर कसलीच इच्छा नव्हती, असं वाटत होत कि बाप रे अजून पंधरा दिवस कसे काढणार आपण इथे, त्यामुळे कालचा दिवस जरासा आळस आणि निगेटिव्ह विचारात गेला, पण आज सकाळीचं ठरवलं कि बिझी राहायचं, वाजू दे थंडी बाहेर पडायचंच आणि खरं सांगते आजचा दिवस खुपच छान आणि एनर्जेटिक होता.
आज सकाळी नाश्ता आवरून मार्केट मध्ये गेले, मागच्या दोन्ही वेळा जरासं बावरून जेवढं गरजेचं आहे तेवढंच उचलून बाहेर पडले होते आज जरा प्रत्येक सेक्शनमध्ये जाऊन माझी डिक्शनरी काढून वस्तू काय आहेत हे समजून घेतलं, बरेच नविन शब्द माझ्या शब्दकोशात भरती झाले, त्यात सगळ्यात आवडलेला शब्द म्हणजे काक्कू. काक्कू म्हणजे केक, माझे दोन तास मस्त गेले, जाता येता रस्त्यात थंडी पासून संरक्षण करायला पुणेरी आतंकवादी स्कार्फ बांधायची आयडिया कामी आली.
इथे कुत्री खूप आवडतात लोकांना, प्रत्येकाकडे एखादं कुत्रं असतं आणि ते खूप गोंडस असतं, त्यांना फिरायला घेऊन येणाऱ्या खूप बायका भेटतात, आपल्यासारखे त्या कुत्रांनाही ओव्हरकोट घातलेले असतात.
खरेदी झाल्यावर सरळ पाठीमागच्या तलावावर वर गेले आणि मज्जा म्हणजे आज तिथे तलाव नव्हताचं दूरवर फक्त पांढरा शुभ्र बर्फ, हे पण कळत नव्हत कि जमीन संपून पाणी कुठे चालू होतंय, मग जर स्नो उकरला कि खाली काळ लागलं कि अजून जमीन आहे, असं करत करत पुढे गेले आणि एका ठिकाणी एकसलग बर्फ लागला, त्या तळ्याच्या पाण्याचा बर्फ झाला होता बाप रे म्हणजे मी तळ्यावर उभी होते तसंच धाडस करून अंदाज घेत पुढे गेले, जवळजवळ तीस फुट तरी आत गेले, खूपच मस्त होता अनुभव पण मग अजून धाडस नाही केल. परत वळून घरी आले. हा बर्फ दोन ते पाच फुटापर्यंत खोल तयार होतो आणि मग लोक त्यावरून गाडी पण घेऊन जातात.
तर अशी माझी सकाळ तर खूप छान गेली, मग घरी येउन सौना घेतलं आणि गारठलेली मी एकदम ओके झाले, तोपर्यंत माझ्या कलीगचा कॉल आला, आणि माझा संध्याकाळचा बेत पण ठरला. पहिल्यांदा आम्ही यांनीच्या मुलाची आईस हॉकीची प्रॅक्टिस बघायला गेलो, लहान गटात तो खेळतो आणि अठरा वर्ष्याच्या मुलांची मॅच पण तिथे बघायला मिळाली, आईस हॉकी बद्दल बरंच काही नंतर सांगेनच, त्याची प्रॅक्टिस पूर्ण झाल्यावर आम्ही यानीच्या घरी गेलो, माझ्या घरापासून साधारण पंधरा किलोमीटरवर त्याचं घर आहे, घर जंगलातचं आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या दोन्ही मुलांना चॉकलेट्स घेऊन गेले होते, घराबद्दल पण लिहीन नाहीतर याची लांबी वाढतच जाईल, तिकडून बाहेर पडलो ते मी यानिता म्हणजे यानीची बायको आणि दोन मुलं, आज ख्रिसमस स्ट्रीट चालू होणार होते आणि त्यासाठी तिथे रस्त्यांना खूप लायटिंग केलं होतं, मग अर्धातास डोळ्याचं पारणं फिटेल अशी आतशबाजी पाहून आम्ही माझ्या घरी परतलो, दोन तासात आमची छान मैत्री झाली आणि पुढच्या विकेंडचे प्लॅन करून ती तिच्या घरी गेली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा