फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४
आज थंडीत कुठे बाहेर पडण्याची इच्छाच नाही झाली. त्यामुळे खरं तर सुट्टी कधी संपेल असं झालं, वाटलं होतं कि कसली काही झंझट नाही मस्त आराम करू दिवसभर, कसलं काय त्यापेक्षा काम केलेली परवडतात पण सभोवताली माणसं हवीत.
आठवडा नवीन जागेशी माणसांशी अड्जस्ट करताना निघून गेला त्यामुळे विशेष जाणवलं नव्हतं, पण आज आर्याची खूपच आठवण यायला लागलीय.
दिवसभर वेगवेगळी गाणी ऐकतीय, क्लासिकल, सेमी क्लासिकल, गझल्स आणि खूप काही, चोवीस तास हाय स्पीड वायफाय कनेक्टिव्हिटी हे वरदानासारखं वाटतंय, त्याशिवाय मी कशी एकटी राहिले असते कल्पनाही करवत नाही.
इथली लोक बघेल तेव्हा कॉफी पित असतात, ती सवय खूप पटकन माझ्यात उतरवून घेतलीय मी. त्यांची कॉफी करण्याची पद्धत वेगळी आहे जर कॉफी मेकर असतो जिकडे तिकडे, कॉफी ची भरड पूड पाण्यात उकळतात, त्याची वाफ होऊन परत पाणी होतं त्याचं आणि अशी कडू कॉफी लोक पितात, मी आपली त्यात दुध आणि साखर घालून घेते, सारखं गरमागरम कॉफी पिणं खरोखर बरं वाटतं.
इथल्या लोकांना त्यांच्या सवयींबरोबर आणि बऱ्याच गोष्टी तापमानानुसार बदलायला लागतात. जसं कि कपडे बूट ओव्हरकोट . त्याहीपेक्षा मजेची गोष्ट म्हणजे त्यांना त्याच्या गाड्यांचे टायर्स वर्षातून दोनदा बदलायला लागतात, त्याबरोबर तीन प्रकारचं डिझेल मिळत इथे आणि किमान दोन प्रकारचं तरी डिझेल त्यांना वर्षभरात वापरायला लागत, शिवाय आणि एक गोष्ट इथे पाहायला मिळाली ती म्हणजे गाड्या पार्किंग मध्ये प्रत्येक गाडीला एक बॅटरी जोडता येते म्हणजे हि बॅटरी गाडी बंद असताना गाडीचं इंजिन आणि गाडीचा आतला भाग गरम ठेवायचा प्रयत्न करते, किती सोयी आहेत न इथे.
एवढे बर्फानी भरलेले रस्ते दुसर्या दिवशी चकाचक असतात, इथेडायरेक्ट नळाचं पाणी पिता येत, फिल्टर वगरे करायची गरज नाही, इलेक्ट्रिसिटी चोवीस तास, बेसिक गोष्टींसाठी नाही झटायला लागत, शिवाय कामाचे तास फक्त आठ तास, लोकं पाच वाजेपर्यंत घरी पण पोहोचतात, रस्ते एवढे व्यवस्थित असतात आणि रस्त्याला गर्दीच नाही, ट्राफिक लागलं वगरे ताणचं नाही, शिवाय संध्याकाळी मुलांसोबत खेळायला वेळच वेळ, ऑफीस मध्ये खूप काही स्पर्धा नाही कारण लोकसंख्या कमी, लोक पंधरा वीस वर्ष आरामात एकाच कंपनीत काम करतात. हि लोकं म्हणतात इंडियात लोकांना वरच्या पदावर जाण्याची खूप गडबड असते, त्यांना काय माहित आपल्या इथे स्पर्धा कितीय ते.
अशा सगळ्या सोयीनी युक्त भारत बनेल तेव्हा अच्छे दिन आलेत असं म्हणता येईल आणि तो आपल्यासाठी सुदिन ठरेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा