फिनलंड ट्रीप डायरी १७ नोव्हेंबर २०१४

 


झिम्माड मज्जा आली आज, झिम्माड मज्जा वरून आठवलं मी माझ्या टीव्ही सीरिअल खूप मिस करतीय. म्हऴसा, आवडी, जान्हवी, मेघना आणि अदिती, बाप रे!! 

तर सांगत होते आज झिम्माड मज्जा आली, आज ऑफिसमध्ये टेस्ट ड्राईव्ह ट्रैनिंग होतं, त्या भल्यामोठ्या मशीनमध्ये बसताना इतकं धडधडत होत, त्यात माझ्या ट्रेनरला इंग्लिश येत नव्हतं, पंचावन्न वर्षाचा म्हातारा माणूस होता, म्हणजे त्यांनीच तशी ओळख करून दिली. तो गेली पंचवीस वर्ष याच कंपनीमध्ये आहे, मी म्हातारा माणूस आहे आणि मला इंग्लिश येत नाही. तर तो शिकावे पर्यंत मी सीटच्या मागे बसले होते, गाडी चालू झाली आणि केबिन  मध्ये आम्ही, तो मला दाखवत होता कुठली बटण दाबायची वगरे वगरे, एक टेकडी बनवलीय तिथे, त्या टेकडीवर गाडी गेल्यावर आम्ही तिरके झालो, माझा चालू झाला आरडाओरडा, त्याला डोन्ट वरी म्हणायचं होत आणि तो नुसतंच वरी वरी म्हणायला लागला, त्या कंडिशन मध्येही मला इतकं हसायला आलं, अजूनही येतंय, मग मी बसले गाडी चालवायला, तर पुशच्या ऐवजी बुश बटन म्हणायचा सारखा. खरं खूप, खूपच मजा आली गाडी चालवायला. आणि ओंडके उचलायला आणि कट करायला, टेक्नोलोंजी काहीही करू शकते, एवढी मोठी झाडं तोडणं आणि उचलणं जॉय स्टीकनी व्हिडियो गेम खेळण्याइतकं सोप्प वाटलं, आणि गाडी चालवणं, कार रेसवाले गेम खेळण्यासारखं वाटलं.

घरी येताना मार्केट जवळ उतरले. जरा खरेदी केली आणि चालत चालत घरी आले, दोन किलोमीटरअलीकडे उतरले होते त्यामुळे तेवढं चालण झालं, आज टेम्परेचर शुन्य होतं आणि वारं पण नव्हतं त्यामुळे काही खूप गरठायला नाही झालं, पण कालचा बर्फ आज जिकडे तिकडे पसरलेला, त्यामुळे निसरडे झालेत रस्ते, एक एक पाय जपून, तोलून चालत होते, ठिकठिकाणी वाळू टाकलीय, तिथे जरा कमी घसरड होतं, जरा चालण्याकडे दुर्लक्ष झालं कि पाय सटकत होता. मग मी जरा इकडे तिकडे बघत होते कि आपली फजिती कोणी बघत नाहीयेत ना, पण मग लक्षात आलं जो तो धावतोय आपल्याकडे कोणाचं लक्षपण नाहीये, चालता चालता कळलं कि जो बर्फ अजून दबला नाही तिथे पाय ठेवायचा म्हणजे घसरत नाही, आणि चालता चालता माझी आर्या कधी झाली कळलंच नाही, बर्फाचे गोळे करून लांब फेकत, बर्फाच्या ढिगाऱ्यात पाय खुपसत, नीटनेटका बर्फ उगाचच विस्कटत, गाणी गुणगुणत घरी पोहोचले, तुम्हाला म्हणून सांगितली झिम्माड मज्जा हसू नका हं मला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४