बंधनं
आज एका कार्यक्रमासाठी बोलावणं आलं होतं तिला...
ऑफिस, घर, मुलं — सगळ्यात गुंतलेली ती. विचारात पडली — खरंच जावं का?
सगळ्यांची नाराजी पत्करून, धावपळ करत, स्वतःसाठी वेळ काढणं...
असं कोण जीवाभावाचं भेटणार आहे, असं वाटून — "जाऊच दे बरं" म्हणत मोबाईल हातात घेतला.
कॉन्टॅक्ट लिस्टवरच्या एकेकाच्या स्टेटसकडे पाहताना वाटलं —
"यांना कसे जिवाभावाचे साथीदार सहज भेटतात? यांना नाही का घरच्यांकडून विरोध होत?"
...आणि तेव्हाच लख्ख प्रकाश पडतो तिच्या मनात —
"अरे, मला तरी कोणी विरोध केलाय का?
पुर्वी कधी काळी झालेला विरोध आपणच अजून कवटाळून बसलोय तर!"
मग मात्र तिने न संपणाऱ्या कामाचा आणि विचारांचा गुंता आवरता घेतला.
खाण्याची जुजबी तयारी करून, मुलांवर आणि नवऱ्यावर किचन कट्टा सोपवून ती आवरायला लागली.
खूप दिवसांनी एकटीच संध्याकाळी बाहेर पडणार होती.
किती नटावं याचा अंदाजच बांधता येत नव्हता...
"हा की हा?" करत गुलबक्षी रंगातला सलवार-कमीज निवडला.
त्यावर झिरझिरीत ओढणी.
आरशातल्या गव्हाळ रंगाच्या स्वप्रतिमेकडे पाहून ती भलतीच आनंदी झाली.
जरा धाडसानं गुलाबी पण न्यूड कडे झुकणारं लिपस्टिक लावलं.
केसांना हलकंसं वळण देऊन मानेवर सोडून दिलं.
स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून फक्त सिल्व्हर ऑक्साईड कानातलं घालून स्वतःला न्याहाळत राहिली.
लेक मागून येऊन मिठी मारते — “ममा, यू लूकस् स्टनिंग!”
नवऱ्यासमोर जाऊन उभी राहिली, तर त्याने गाडीची किल्ली हातात दिली.
लेक म्हणाली — “लवकर ये...”
सासूसासऱ्यांनी नुसताच कटाक्ष टाकला — पण त्यात विरोध नव्हता, फक्त आश्चर्य होतं.
थंडगार वाऱ्यावर स्वार होताना ती हलकी हलकी होत होती...
जणू महिन्यांच्या ओझ्याला आज थोडं विसावायला मिळालं होतं.
ती बाहेर पडली होती — कार्यक्रमासाठी नाही, तर स्वतःसाठी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा