वादळासारखा येतोस



वादळासारखा येतोस तू नेहमी...
मी निघते घुसळून नखशिकांत ... 
मोहरते आणि निवतेही तुझ्या सहवासात आणि निघून जातोस अनंत काळासाठी... 
नाहीसा होतोस सगळी बंधन झुगारून... 
मग मी, माझी मी असते, तुझ्यापासून पूर्ण वेगळी, तरी तुझ्यातच गुंतलेली...
तुला जाणीवही नसते माझ्या अस्तित्वाची...
आणि मी मात्र, वाहणारा वारा, गात्रगात्र नाहू घालणारा पाऊस, उन्हाची तिरीप, उमलणारी फुलं, तेवणारा दिवा, कशाकशात तुझं अस्तित्व शोधात राहते...
वादळाला थांबवू पाहणं मला नाही जमणार, माहित असलं, तरी वादळ परत येणार अशी आशा असते, बरेचदा खात्रीच असते...
वाट पाहत राहते, कधी होते सैरभैर...
वाट पाहणं अशक्य होऊन जातं, मग समजावते काळजाला ... 
रमते आठवणींमध्ये, तूच मागे ओंजळीत टाकलेल्या...
कधी वाटेवर डोळे लावून बसते...
तिन्हीसांजेला मात्र जीव घाबरा होतो कधी... 
त्या अज्ञात शक्तीला मागते, तुला सुखी ठेव... 
तूपण असा कि जाणून आहेस चांगलाच मला...
कधीही उगवलास तरी मी तुझीच, साताजन्माच्या गाठी बांधल्यागत... 
तुझ्यात विरघळून जायला आणि परत परत एकमेकांवर सुख बरसायला...
अनासक्त...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४