फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४
आज सुट्टी त्यामुळे आरामाचा दिवस होता, खरंच मस्त आराम केला आज. सकाळ संध्याकाळ एक एक मुव्ही बघितला. आज पहिल्यांदाच उजेड असताना घरात होते म्हणजे माझ्या अपार्टमेंटमध्ये. मागच्या बाजूच्या खिडक्या उघडून बघितल्या तर बाहेर छोटासा पोर्च आहे, दोन खुर्च्या टेबल ठेवलंय आणि मागच्या बाजूला एक तलाव आहे. जरा आवरून साधारण दोन च्यासुमारास बाहेर पडले चालायला, बाहेर स्नो फॉल होत होता, तो हलके हलके तरंगत माझ्या काळ्या ओव्हरकोट आणि हॅन्डग्लोव्जवर येवून पडत होता, ते फिलिंग इतकं सही होत नं, मग मी थोडे फोटो काढले आणि सुसाट धावत त्या तलावाकडे गेले, आता कडेकडेच पाणी हळूहळू गोठायला लागलाय, त्याचा एकसमान बर्फ तयार झाला होता, साधारण पाच मिलीमीटरचा, जशी थंडी वाढते तसा हा बर्फ एक दोन फूट भर तयार होतो म्हणजे त्यावर अगदी सहज चालता येतं, इथे लोकं बाइकिंग करतात, आणि हो इथले खेळ पण बर्फातले, जसं कि आईस हॉकी, आईस फ़ुटबाँल असे.
अर्धातास मस्त दमून आणि गारठून घरी आले, ठरवलेलं कि आज सौना घ्यायचा, खरं म्हणजे भीती वाटत होती कि कसं होईल हे काही वेगळंच तर नाही होणार, म्हणून आज एक तासासाठीच सेटिंग केलं, पण आई शप्पत खरं सांगते, इतकं भारी आणि रिलॅक्स वाटलं, एका तासाचं सेटिंग करताना असं वाटत होतं कि एवढं एक तास रिकामं कसं बसायचं पण नंतर तिथून बाहेर पडण्याची इच्छाच होत नव्हती, मला माझ्या बाळंतपणाची आठवण झाली.
सौना हा फिनिश शब्द आहे, अगदी पूर्वीच्या काळापासून सौना इथल्या प्रत्येक घराघरात असतो, हि एक छोटी खोली बाथरूम इतकीच महत्वाची आहे इथे. लोकं जिम, जॉगिंग, स्विमिंग असा कुठलाही व्यायाम झाल्यावर सौना घेतात. हि एक लाकडाची बांधलेली खोली असते, एका कडेला शेगडी असते, सध्या इलेक्ट्रिक शेगडी आहे पण पूर्वी कोळश्याची असायची शेगडी. माझ्या इथल्या सहचार्यानी त्याच्या घरच्या सौन्यात बसवलेली कोळश्याची शेगडी दाखवली होती. त्या शेगडीवर दोन फूट उंच दगड रचून ठेवले असतात. सोबत एक मोठा चमचा आणि दहा लिटर पाण्याचा डब्बा असतो. लाकडी बेंच असतो खोलीत जरा उंचावर, तर एकदा हे दगड गरम झाले कि त्याच्यावर यज्ञकुंडत जशी आहुती देतो तसं त्या मोठ्या चमच्यानी पाणी सोडत राहायचं कि मग त्या पाण्याची वाफ व्हायला लागते आणि आपण जेवढ उंचावर बसू तेवढं आपल्याला गरम वाटायला लागत, साधारण सत्तर ऐंशी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तयार होतं आतमध्ये, बाहेरच्या वजा सात डिग्री सेल्सिअस ला गारठलेले हातपाय मोकळे मोकळे व्हायला लागतात.
तर अशा या सौना चा आज मी मनमुराद आनंद घेतला. जेव्हा मी जंगलात जाईन कामासाठी तेव्हा आल्यावर पाच सहा तासासाठी तरी माझा मुक्काम इथेच असेल.
Khupach chan...
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhup sunder
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअप्रतिम ,
उत्तर द्याहटवामस्त narration ,
Feeling like I was been there for a while
धन्यवाद
हटवा